राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल अर्जुनराव खोतकर यांच्या सर्वपक्षीय सत्काराच्या कार्यक्रमात मान्यवर पुढाऱ्यांनी जिल्ह्य़ाचे विकासाचे प्रश्न मांडले आणि ते सोडविण्यास प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. सत्कारमूर्ती खोतकर यांनीही जनतेच्या प्रश्नांसाठी आतापर्यंत उठविलेल्या आवाजाचा उल्लेख करून मंत्रिपदाचा उपयोग जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी करण्याची ग्वाही दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या वेळी खोतकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. पालकमंत्री बबनराव लोणीकर, राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, रासपाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश चितळकर, रिपाइंचे विभागीय अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चोथे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हफीज, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश राऊत, कार्यक्रमाचे आयोजक भास्कर अंबेकर यांच्यासह भाजपचे आमदार संतोष दानवे व आमदार नारायण कुचे व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना खोतकर यांनी, शेतकरी, सर्वसामान्य जनता, उद्योजक, व्यापारी यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची आजपर्यंत आपली भूमिका राहिली. जिल्ह्य़ातील युतीची ताकद पाहता विकासचक्र फिरल्याशिवाय राहणार नाही. जालना-वडिगोद्री रस्त्याची सुधारणा, जालना शहरातील अंतर्गत जलवाहिनीचे काम आणि जिल्ह्य़ातील अन्य प्रश्न सोडविण्यासाठी दानवे व लोणीकर यांच्यासोबत काम करणार आहोत, असे सांगितले. दानवे यांनी जिल्ह्य़ास लाभलेल्या आणखी एका मंत्रिपदाचा उपयोग विकासासाठी होईल, असे सांगून सर्वानी बसून तज्ज्ञांच्या मदतीने जिल्ह्य़ाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांकडून या विकास आराखडय़ास मान्यता मिळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गेल्या ३५ वर्षांत जिल्ह्य़ाच्या विकासास आली नव्हती तेवढी गती मागील २० महिन्यांत आल्याचा दावा करून, शहरातील रस्ते विकास, मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे, ड्रायपोर्ट, जलयुक्त शिवार, दुष्काळी अनुदान, पीकविमा आदी उदाहरणे त्यांनी दिली.
मंत्री लोणीकर यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जिल्ह्य़ाचा विकास करण्यात येत असल्याचे सांगताना जिल्ह्य़ातील विद्युत विकासाचा आराखडा केंद्राकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक विकास आराखडय़ाचा निधी २५२ कोटींपर्यंत वाढविला. दुष्काळी स्थितीत मराठवाडय़ात ४ हजार टँकरने पाणीपुरवठा केला, असे ते म्हणाले. ‘वॉटरग्रीड’च्या माध्यमातून मराठवाडय़ातील पाणीपुरवठा योजनांचे एकात्रीकरण करण्याच्या योजनेचा पुनरुच्चार त्यांनी केला.
आमदार टोपे यांनी जिल्ह्य़ातील जालना-वडिगोद्री रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधताना अवैध वाळू वाहतुकीमुळे जिल्ह्य़ात रस्त्यांची दुर्दशा होत असल्याकडे लक्ष वेधले. शिवाजी चोथे यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्याची गरज व्यक्त केली. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी खोतकर यांचा मित्रपरिवार केवळ शिवसेनेतच नसून विविध पक्ष-संघटनांमध्ये तसेच उद्योग, व्यापार आदी क्षेत्रांतही आहे. त्यामुळेच त्यांचा सत्कार पक्षाच्या चौकटीपलीकडे जाऊन करण्यात आल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2016 रोजी प्रकाशित
खोतकर यांच्या सर्वपक्षीय सत्कारात विकासाचा जागर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या वेळी खोतकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-07-2016 at 01:10 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All parties felicitated program for arjunrao khotkar