मध्य प्रदेशातील १६ मजूर रेल्वेखाली चिरडले गेल्यानंतर स्थलांतरितांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे मध्य प्रदेशातील खांडवा येथे पुन्हा बाराशे मजुरांना रेल्वेने पोहोचविले जाणार आहे. शनिवारी सायंकाळी एका विशेष रेल्वेची व्यवस्था केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली. मात्र, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्य सरकारांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मजुरांच्या अडचणी लगेच सुटण्याची शक्यता नाही. वेगवेगळ्या राज्यांशी समन्वय साधला जात असल्याचे प्रशासनाने सांगितले.

वेगवेगळ्या राज्यातच चालत जाणारे अनेक मजूर औरंगाबाद जिल्ह्यतून रात्री प्रवास करतात. वैजापूर तालुक्यातील काही गावकऱ्यांनी रात्री चालत जाणाऱ्या या प्रवाशांना जेवणाची आणि पाण्याची सोय केली आहे.  मजुरांच्या लहान मुलांना दूध पुरविले जात आहे. त्यासाठी दोन गावकरी गावाबाहेर चार-पाच किलोमीटपर्यंत जातात. किती मजूर आहेत, याचा अंदाज घेतात. त्यानंतर गावातील काहीजणांकडून जेवण तयार केले जाते. या शिवाय बिस्कीट आणि लहान मुलांसाठी दुधाची पिशवीही दिली जाते. मात्र, ही मदत पुरेशी नसल्याचे दिसून येत आहे. या मजुरांना वाहनाने त्यांच्या गावी परत जाता येईल का, या प्रश्नाचे उत्तर  प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिले जात नाही. ‘समन्वय सुरू आहे’, एवढेच उत्तर दिले जाते. विविध राज्यांकडून मिळणारा प्रतिसाद कमालीचा संथ असल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी देत आहेत. टाळेबंदीमध्ये वाढ होईल, अशी भीती या मजुरांना वाटत आहे.

मराठवाडय़ातील शिबिरांमध्ये चौदा हजाराहून अधिक मजूर उपस्थित आहेत. त्यांची काळजी घेतली जात आहे. मात्र, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल हे राज्य अजूनही मजूर घेऊन जाण्यासाठी तयार नाहीत. शहरातील अयोध्यानगरी भागात या राज्यांमध्ये आपापल्या गावी जाण्यासाठी इच्छुक मजुरांचा एक तांडा गेले काही दिवस उघडय़ावर बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे एखाद्या झाडाच्या सावलीत बसायचे, मिळेल तिथून पाणी प्यायचे. कोणी खायला आणून दिले तरच पोटात चार घास घालायचे, अन्यथा उपाशीपोटी रस्त्यावर  राहण्याची वेळ आली आहे. यातील अनेकांना नाव नोंदणी कुठे करायची, आपल्या गावी जायला परवानगी कशी घ्यायची, याची माहिती नाही. प्रशासनाकडूनही या मजुरांची हेळसांड सुरू आहे. दरम्यान अयोध्यानगरीत या मजुरांनी घाबरून जाऊ नये शिवसेना पूर्ण मदत करेल, असे आश्वासन माजी खासदार चंद्रकांत खरे यांनी दिले.  शनिवारी सायंकाळी एक विशेष रेल्वे खंडवापर्यंत जाणार आहे. सामाजिक अंतर राखता यावे म्हणून एका डब्यात ५४ प्रवासी असणार आहेत. त्यांना एक वेळचे जेवण आणि पाण्याची बाटली प्रशासनाकडून दिली जात आहे. अनेक राज्य सरकारांकडून भाडे मजुरांनी त्यांचे द्यावे, असे म्हटले असल्यामुळे त्यांना त्यांच्या गावी पोहोचविणे अवघड होऊ लागले असल्याचे सांगण्यात येत आहे.

७४ जण स्वगृही

शहरात अडकून पडलेल्या ७४ मजुरांचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यांना महापालिकेच्या तीन बसमधून स्वगृही पाठविण्यात आले. यात जालना ५, बुलढाणा ५, अकोला ६, वाशीम १३, भोकरदन १९ व जळगाव येथील २३ जणांचा समावेश होता. यावेळी  शहर अभियंता एस. डी. पानझडे, सहायक आयुक्त श्रीमती विजया घाडगे आदींची उपस्थिती होती. या वेळी मजुरांना मास्क देण्यात आले होते. एका बसमध्ये ३० मजूर बसवून त्यांना जालना, अकोला, वाशीम व बुलढाणाकडे पाठविले. भोकरदन येथील १९, तर जळगावला २३ मजूर पाठविण्यात आले.