रांगेत गेला रविवार

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्यानंतर नोटा बदलण्यासाठी रविवार रांगेत गेल्याचा अनुभव औरंगाबादकरांनी घेतला. विविध बँकेतील रोकड संपल्याने रांगांचा फेरा रविवारीही लांबला. १८ नोव्हेंबपर्यंत अशीच स्थिती राहू शकते, असा बँक अधिकाऱ्यांचा दावा आहे. औरंगाबाद शहरात राष्ट्रीयकृत बँकांचे ३५० एटीएम आहेत. खासगी बँकाचे २६० तर सहकारी बँकांचे १२५ हून अधिक एटीएम आहेत. एटीएममध्ये पुरेशी रोकड न आल्याने नागरिक हैराण होते. एटीएम सुरू होण्यापूर्वी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. दोन हजार रुपयांचा नोटा बाजारात आल्या असल्या तरी त्या वापरण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात १०० रुपयांचे चलन उपलब्ध नसल्याने मोठी अडचण झाली आहे.

औरंगाबादसाठी १२५ कोटी रुपयांच्या २ हजार रुपयांचे चलन उपलब्ध झाले होते. त्याचे वितरण झाले असले तरी व्यवहारात या नोटा उपयोगात आणणे अवघड होऊन बसले आहे. कारण दोन हजाराची नोट दिल्यानंतर ग्राहकाला पैसे परत करण्याची चलन नसल्याने व्यापाऱ्यांना अडचणी जाणवत होत्या. नागपूरहून १ हजार कोटी रुपयांच्या चलनाची प्रतीक्षा आहे. ही रक्कम १८ नोव्हेंबपर्यंत  न आल्यास समस्या निर्माण होऊ शकतात, असे बँकेचे अधिकारी सांगत आहेत. काही बँकाच्या जनधन खात्याच्या रकमेत अचानक मोठी वाढ झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करावी लागली आहे. रविवारी दुपापर्यंत औरंगाबाद शहरात एटीएम व बँकांच्या संरक्षणासाठी १२०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रांगा लावून नोटा बदलून घेण्यात रविवारचा दिवसही खर्ची पडला असल्याचे दिसून आले.