औरंगाबादमध्ये बहिण आणि भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस असून हल्लेखोरांनी घरातील दीड किलो सोने व रोख साडेसहा हजार रुपये पळवल्याचीही माहिती आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण खंदाडे (१८) आणि सौरभ खंदाडे अशी मृत बहिण भावाची नावे आहेत. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आई-वडिल परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात लालचंद खंदाडे हे कुटुंब भाड्याने राहते. मात्र, काही कामानिमित्त लालचंद आपल्या पत्नी व एका मुलीला घेऊन जालना येथे गेले होते. त्यामुळे घरात त्यांची मोठी मुलगी किरण आणि तिचा भाऊ सौरभ हे दोघेच होते.
रात्री ८ च्या सुमारास लालचंद हे घरी परतले. मात्र, वाहनाचा हॉर्न वाजवूनही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी वाहन उभे करून घरात पाहिले असता बाथरूममध्ये बहीण-भावाचे मृतदेह त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटना उघडकीस आली.
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दोघांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण, आई-वडिल घरी नसताना हत्या झाल्यामुळे हल्लेखोर हे ओळखीचे असावेत आणि पाळत ठेवून ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 1:10 pm