महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९२ टक्के लागला आहे. बारावीनंतर दहावीतही औरंगाबाद विभागाचा क्रमांक राज्याच्या इतर विभागात सर्वात खाली घसरला आहे. बारावीत औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ तर दहावीचा निकाल ९२ टक्के लागला आहे.

औरंगाबाद विभागात बारावीप्रमाणे जालना जिल्हा दहावीतही अव्वल राहिला आहे. जालन्याचा निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. तर, बारावीप्रमाणे दहावीतही विभागात सर्वात कमी निकालाची टक्केवारी परभणी जिल्ह्य़ाची राहिली आहे. परभणीचा निकाल ९०.६६ टक्के आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ाचा ९२.१०, बीडचा ९१.२४ तर हिंगोलीचा ९१.९४ टक्के निकाल लागला आहे. विभागातील पाचही जिल्ह्य़ात मिळून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.१९ एवढी आहे. तर मुलांची ८९.४४ एवढी आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ातून ३५ हजार ५११ पैकी ३१ हजार ८६० मुले उत्तीर्ण झाले तर २९ हजार ११७ पैकी २७ हजार ६६३ मुली उत्तीर्ण झाल्या. बीडमधील २४ हजार ६१२ पैकी २१ हजार ८९० मुले तर १८ हजार १७६ पैकी १७ हजार १५० मुली उत्तीर्ण झाल्या. परभणीतील १५ हजार ८५१ पैकी १३ हजार ८१४ मुले तर १२ हजार ८३४ पैकी १२ हजार १९३ मुली उत्तीर्ण झाल्या. जालन्यातील १७ हजार ८५४ पैकी १६ हजार ४०४ मुले तर १४ हजार ५०७ पैकी १४ हजार २९ मुली उत्तीर्ण झाल्या. हिंगोलीतील ८ हजार ५५२ पैकी ७ हजार ६०० मुले तर ७ हजार ७५० पैकी ७ हजार ३८८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

पाचही जिल्ह्य़ातील मिळून एकूण १० हजार ९२८ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. सर्वाधिक पुनर्परीक्षार्थी हे औरंगाबाद जिल्ह्य़ात होते. औरंगाबादमध्ये ३ हजार ३५८, बीडमध्ये २ हजार १४६, परभणीत २ हजार १०४, जालन्यात १ हजार ९८९ तर हिंगोलीत १ हजार ३३१ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८८.४८ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज बुधवारी अखेर जाहीर करण्यात आला असून परभणी जिल्ह्याचा निकाल ८८.४८ टक्के इतका लागला आहे. परभणी जिल्ह्यातील ३२ हजार ७३ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यातील ३१ हजार ७७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विशेष प्राविण्यासह ७ हजार ४२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ८ हजार ४४७, द्वितीय श्रेणीत ७ हजार १६९ तर उत्तीर्ण श्रेणीत ४ हजार ७६६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण २८ हजार ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या वेबसाइटवरून अर्ज करायचा असून, त्यासाठी आधी छायाप्रत घ्यावी लागणार आहे. गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट तर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

हिंगोलीचा दहावीचा निकाल ९१.९३ टक्के

हिंगोली जिल्ह्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९१.९३ टक्के लागला असून जिल्ह्यातील चारही शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जिल्ह्यातून यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत १६३०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९१.९३ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून ८ हजार ५५२ मुलांपैकी ७ हजार ६०० मुले उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८८.८७ टक्के आहे. तर ७ हजार ७५० मुलींपैकी ७ हजार ३८८ मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.३३ टक्के आहे. जिल्ह्यातून ४ हजार १८३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात असलेल्या बोथी, गोटेवाडी, पिंपळदरी व जामगव्हाण या चारही शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा निकाल १०० टक्के लागला.

गैरमार्गाची प्रकरणे

विभागातील औरंगाबाद व बीडमध्ये प्रत्येकी २३, परभणीत १०३, जालन्यात २४ तर हिंगोलीत ८ असे मिळून एकूण १८१जणांनी परीक्षेत गैरमार्ग अवलंबल्याची प्रकरणे असून त्यात बीडमध्ये २, परभणी व जालन्यात प्रत्येकी एक तोतयागिरी केल्याचे उघडकीस आले आहे. यातील ७० प्रकरणाची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.