03 December 2020

News Flash

भाजपमध्ये उमेदवारीचा गोंधळ

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ; पंकजा मुंडे यांची भूमिकाही महत्त्वाची

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश, ऊसतोड मजुरी कराराच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांचा जनाधार घसरणीला लागावा यासाठी सुरू असणारे प्रयत्न या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये उमेदवारी निवडताना भारतीय जनता पक्षाच्या धुरीणांसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहनोंदणी प्रमुख म्हणून काम करणारे प्रवीण घुगे यांनी आणि भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी उमेदवारी मागितली आहे. गेल्या वेळी या निवडणुकीदरम्यान भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघात पुन्हा वर्चस्व मिळविले. आता ते पुन्हा एकदा तयारीला लागले आहेत. मात्र या दुरंगी लढतीमधील भाजपचा उमेदवार कोण हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या सगळया प्रक्रियेत पंकजा मुंडे यांचे मत केंद्रस्थानी ठरण्याची शक्यता आहे.

मराठवाडय़ातील पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी नोंदणी प्रक्रिया करोनाकाळामुळे अधिक चालली. अधिक नोंदणी करण्याची प्रक्रिया राष्ट्रवादी आणि भाजपकडून हाती घेण्यात आली. परिणामी, या वर्षी या मतदासंघातील नोंदणी आता तीन लाख ४७ हजारांहून अधिक झाली आहे.  इच्छुकांनी मराठवाडय़ात दौरेही केले. ही सगळी प्रक्रिया सुरू असताना भाजपमधील गणिते बदलत असल्याचे सांगण्यात येत आहे. ऊसतोडणी मजूर कराराच्या निमित्ताने भाजपने सुरेश धस यांना १६ जिल्ह्य़ांत १०० मेळावे घ्यायला लावल्याने पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या. पक्षाच्या वतीने मेळावे घ्यायला लावून काय साध्य केले, असा सवालही त्यांनी केला. या घटना घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांची कोंडी केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येऊ लागले. डॉ. भागवत कराड याची राज्यसभेतील नियुक्ती आणि आमदार रमेश कराड यांची नियुक्ती भाजपकडून ‘माधव’चे (माळी, धनगर, वंजारी) सूत्र मजबूत करण्याचा  होता. एका बाजूला पंकजा मुंडे यांचा जनाधार घसरणीला लागावा असे होणारे प्रयत्न आणि दुसरीकडे ‘ओबीसी’मध्ये संदेश जावा अशी रचना करून झालेल्या नियुक्यांमुळे भाजपमधील गट-तट अधिक स्पष्टपणे पुढे येत आहेत.

एकनाथ खडसे यांना पक्ष सोडण्याच्या तयारीत असतानाच पंकजा मुंडे यांच्या भोवतीही रिंगण टाकले जात होते. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये आता पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार निवडणे बाकी आहे. गेल्या वेळी निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे विस्कळीत झालेल्या प्रचार यंत्रणेमुळे शिरीष बोराळकर यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांनीही पक्षाकडे पुन्हा उमेदवारीसाठी दावा केला आहे. पदवीधर मतदारसंघात सहनोंदणी प्रमुख म्हणून काम करताना प्रवीण घुगे यांनी मतदार नोंदणीमध्ये अधिक काम केल्याचा दावा केला जात आहे. ‘पदवीधराचा निर्धार चळवळीतील आमदार’ असे घोषवाक्य करून प्रवीण घुगे यांनी उमेदवाराची दावा पक्ष नेते मान्य करतील, अशी रचना केली आहे. ही उमेदवारी ठरविताना पंकजा मुंडे यांचे मत कसे आणि कितपत विचारात घेतले जाते यावर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची चुरस ठरणार आहे.

संस्थात्मक संघटकांचा प्रभाव

पदवीधर मतदारसंघावर शैक्षणिक संस्थांवर प्रभाव असणाऱ्या संघटकांचा प्रभाव असल्याचे दिसून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांचे जाळे मराठवाडाभर आहे. विद्यापीठाच्या राजकारणाचाही या मतदारसंघावर प्रभाव असतो. औरंगाबाद, लातूर, बीड तसेच नांदेड जिल्ह्य़ातील शैक्षणिक संस्थांमधून प्रचार यंत्रणा राबविली जाते. प्राध्यापक, प्रपाठक मंडळी निवडणुकीमध्ये सक्रिय असतात. संस्थात्मक संघटकांचा प्रभाव निवडणुकीवर असतो. यावर्षी नव्याने नोंदणी करण्यात आल्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी त्यांची यंत्रणा पुन्हा नव्याने बांधली असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.

गेल्या वेळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. पक्ष संघटनेवर दु:खाचा डोंगर कोसळला. तरी मिळालेली मते आणि बाद झालेली दहा हजार मते लक्षात घेता मोठी झेप घेतली होती. त्यामुळे या वेळी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

-शिरीष बोराळकर, भाजप नेते

अनेक वर्षे विद्याार्थी संघटनेत काम केले आहे. त्यामुळे या वेळी उमेदवारी काम मिळावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे.

– प्रवीण घुगे, भाजप नेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 12:14 am

Web Title: aurangabad graduate constituency confusion of candidature in bjp abn 97
Next Stories
1 औरंगाबादच्या अर्थचक्राला गती
2 पक्षी निरीक्षणासाठी यंदा अधिक भ्रमंती
3 औरंगाबाद शहर बससेवा ५ नोव्हेंबरपासून सुरू
Just Now!
X