शहरात स्कायबससेवा सुरू करण्यासाठी जवळपास ९०० कोटीची आवश्यक्ता लागणार प्रति कि.मी ६० कोटी रूपये अपेक्षीत असून यासाठी वॉप कॉस या सरकारी कंपनीला सोबत घेऊन महानगर पालिकेने डीपीआर तयार करावा अशा सुचना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवार दि.१६ रोजी सुक्ष्म सिंचन परिषदेच्या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केल्या.

शहरात स्कायबससेवेला लवकरच हिरवा कंदिल मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र औरंगाबाद वासीयांना मेट्रो ट्रेन विसरावी लागणार आहे. स्कायबससेवा ही मेट्रो ट्रेनच्या तुलनेत कमी खर्चाची असून यासाठी जागाही कमी लागते व प्रदुषणाचा प्रश्न निर्माण होत नाही. मेट्रो ट्रेन प्रकल्प तयार करण्यासाठी प्रति कि.मी.३५० कोटी रूपये लागतात तर स्कायबसला प्रति कि.मी ६० कोटीचा खर्च लागतो. यासाठी स्कायबसचे सादरीकरण शहरातील खासदार, आमदार, मनपा यांना दाखवण्यात आले आहे. स्कायबससाठी याबसचे असलेले फायदे स्टेशनच्या अडचणीबाबत प्रदिप कुमार व डॉ. विक्रम सिंग यांनी शहरातील सर्वे केला आहे.

यात शहरातील जुन्याभागात काही अडचणी असल्याच्या त्यांनी सांगितल्या तर नविन शहरात कोणतीच अडचण येणार नसल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पासाठी जमीन जास्त लागणार नाही, टॉवर उभारून याचे काम करता येते. यामुळे प्रदुषानाची चिंता, जागेची अडचण नसणार आहे. त्यामुळे मेट्रो ट्रेनच्या तुलनेत स्कायबस ही सेवा औरंगाबाद शहरासाठी पुरणार असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. तरी यासाठी महानगर पालिका प्रशासनाने वॉप कॉस या कंपनीला सोबत घेऊन लवकर डीपीआर तयार करून सादर करावा अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या.