नोटाबंदीचा निर्णय ज्या उद्देशासाठी घेतला तो पूर्णत: फसला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. नोटबंदीच्या विरोधात जिल्हा स्तरावर सर्वत्र पत्रकार बैठक घेऊन काँग्रेसची भूमिका व्यक्त करण्यासाठी ते औरंगाबाद येथे आले होते. नोटाबंदी व्यतरिक्त अन्य कोणत्याही विषयावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. या विषयाच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच निर्णय घेऊ शकतात. तुम्ही त्यांनाच विचारा एवढेच ते वारंवार सांगत होते. नोटाबंदीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांचे मोठे हाल झाले. लोकांनाही हा निर्णय खूप चांगला वाटल्याने त्यांनी संयम बाळगला. सरकारच्या निर्णयाला साथ दिली. आता या निर्णयाला ५० दिवस होऊन गेल्यानंतर निर्णयाचे काही एक फलित दिसून येत नाही. या निर्णयामुळे देशाची जगभर नालस्ती झाली. त्यामुळे पंतप्रधानांनी माफी मागावी, असे आपले मत असल्याचे थोरात म्हणाले.

आंदोलन तर करायचे पण कधी?

सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हास्तरावर आंदोलन करण्याचा कार्यक्रम काँग्रेसने सर्व जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांना दिला. औरंगाबादमध्ये जिल्हाध्यक्षांनी राजीनमा दिल्यानंतर हे आंदोलन कधी होणार, असा प्रश्न पत्रकार बैठकीत विचारला जात होता. त्याचे अधिकृत उत्तर देण्याचे टाळण्यात आले. थोरात यांनी आंदोलनाचा चेंडू प्रभारी अध्यक्ष नामदेव पवार यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी नंतर पत्रकार बैठकच गुंडाळली. सर्वत्र ६ जानेवारी रोजी आंदोलन होणार आहे. औरंगाबाद येथे याच तारखेला मुस्लीम मोर्चा निघणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा मोर्चा कधी होईल हे आज कळविण्यात येईल. नंतर तारीख कळवू, एवढेच काँग्रेसचे नेते सांगत होते.