औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरुन जाधववाडीकडे जाताना एका अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे ४० वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. चालक लघुशंकेसाठी थांबला असता लिफ्ट घेणार्‍याने त्याची मोटरसायकलच पळवली आहे.

औरंगाबादमध्ये राहणारे सुरेश कैरती (४०) हे ११ जानेवारी रोजी मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरुन रेल्वे स्टेशनवरुन जाधववाडी चौकाकडे जात होते. बन्सीलाल नगर परिसरात एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. माणुसकी दाखवत सुरेश यांनी त्या व्यक्तीला लिफ्टही दिली. हडको चौकात सुरेश हे लघुशंकेसाठी थांबले होते. याच संधीचा फायदा घेत लिफ्ट घेणाऱ्या व्यक्तीने सुरेश यांची दुचाकी पळवली.

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप सुरेश कैरती यांनी केला आहे. अखेर वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानंतर सिडको पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करुन घेत तपासाला सुरुवात केली आहे.