दिवस घर बांधून राहात नाही. हेही दिवस जातील. खचू नका, विधात्याने दिलेले सुंदर आयुष्य दु:खाला घाबरून अजिबात संपवू नका. आमच्यासारखे हजारो भाऊ तुमच्या दु:खात सहभागी आहेत. तुम्ही एकटे नाहीत, हे सांगण्यासाठीच भाऊबीजेची भेट घेऊन आपली भेट घ्यावयास आलो आहोत, असे प्रतिपादन िपपरी चिंचवड महापालिकेचे सदस्य शिवाजी पाडुळे यांनी केले.
जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर व आíथकदृष्टय़ा दुर्बल १५० महिलांना भाऊबीजेच्या निमित्ताने पुणे येथील सांगवी नवरात्र उत्सव मंडळ व श्री तुळजाभवानी मित्रमंडळाच्या वतीने फराळाचे साहित्य, किराणा व साडी भेट देण्यात आली. रुईभर येथील जयप्रकाश विद्यालयात आयोजित छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमात पाडुळे बोलत होते. शनिवारी रुईभर येथे रुईभर, बेंबळी, कनगरा, विठ्ठलवाडी, अनसुर्डा येथे १००, तर लोहारा येथे सास्तूर, माकणी, दक्षिण जेवळी, उत्तर जेवळी, बेंडकाळ व लोहारा येथील ५० अशा एकूण दीडशे गरीब, वंचित कुटुंबांना मदतीचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर बालविकास संस्थेचे अध्यक्ष सुभाष कोळगे होते.
जि.प. सदस्य रामदास कोळगे, तुळजाभवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुल गिते, नागनाथ थोरात, बाळासाहेब िशदे, किरण शिनगारे, दशरथ पाटील आदी उपस्थित हेते. जि.प. सदस्य रामदास कोळगे यांनी प्रास्ताविक केले. दुष्काळी स्थितीत मोठय़ा संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबीयांसह शेतमजूर, गरीब, वंचित कुटुंबीय हलाखीचे जीवन जगत आहेत. या पाश्र्वभूमीवर गरजवंतांच्या मदतीस धावून आलेल्या दोन्ही मंडळांचे आभार मानले. राहुल गिते, सुभाष कोळगे यांनीही मनोगत व्यक्त केले. दोन्ही मंडळांचे सदस्य व जयप्रकाश विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.