पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; बंब यांचे आरोप पाटील यांनी फेटाळले

अ‍ॅन्युटीमध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. तर कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपत येण्यासाठी व पोटनिवडणुकीतील खर्चापोटी पाच कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. मराठवाडय़ातील दोन आमदारांकडून चंद्रकांत पाटील निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. बंब यांचे आरोप चंद्रकांत पाटील यांनी फेटाळले आहे. जाधव यांच्या आरोपांबाबत त्यांच्याशी बोलणार असून, आता जनतेनेच प्रतिक्रिया द्यावी अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अ‍ॅन्युटीत ९०० कोटींचा गैरव्यवहार

सार्वजनिक बांधकाम विभागात रस्त्यांच्या कामाची अ‍ॅन्युटी योजनेतून करावयाच्या कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल बनवताना सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी खासगी कंपन्यांच्या घशात घातला जात आहे. यामध्ये पद्धतशीरपणे भ्रष्टाचाराची रचना उभी केली जात असल्याचा आरोप करत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खात्यातील हा कथित गैरव्यवहार करण्यासाठी सारी यंत्रणा पुण्यातून कार्यान्वित करण्यात आली आहे. अशी यंत्रणा नागपूर किंवा कोल्हापूरमधून का नाही, असा सवाल उपस्थित करत बंब यांनी सरकारच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ ही पद्धत बंद करून आता सरकारने अ‍ॅन्युटीच्या माध्यमातून पैसा उभा करण्याचे ठरवले. सुमारे ३२ हजार कोटी रुपयांची कामे या योजनेतून घेण्याचे ठरवण्यात आले. या कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी खासगी एजन्सीला प्रत्येक अंदाजपत्रकाच्या तीन टक्क रक्कम देण्याचे ठरवण्यात आले. काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या ओळखीच्या एजन्सींनाच हे काम देऊन अपहार करण्याचे षड्यंत्र रचले आहे. रस्ते प्रकल्प विभागाकडून हे काम होणे अभिप्रेत होते. तांत्रिक क्षमता असणारा अधिकारीवर्ग निवांत बसवून ठेवत खासगी एजन्सीकडून असे काम करवून घेण्यात अपहाराची रचना विकसित केली जात असल्याचे त्यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ३२ हजार कोटींच्या या कामाची ३ टक्के रक्कम ९०० कोटी रुपये होते. ही रक्कम खासगी व्यक्तींच्या घशात जाऊ नये. अजूनही वेळ गेलेली नाही, असे असे बंब यांनी पत्रात नमूद केले आहे. हे काम करण्यासाठी धोंगडे या अधिकाऱ्यांची का नियुक्ती केली, असा प्रश्नही बंब यांनी उपस्थित केला आहे. धोंगडे यांचे पूर्ण नाव त्यांनी पत्रात नमूद केलेले नाही, मात्र नांदेड जिल्ह्य़ातील एका प्रकरणाचा तो मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.

हायब्रीड अ‍ॅन्युइटीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी

मुंबई : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही हायब्रीड अ‍ॅन्युइटी पद्धतीने १० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.  या कामाचे सविस्तर नकाशे आणि अंदाजपत्रके(डीपीआर) तयार करण्यासाठी अनेक कंपन्या नियुक्त करण्यात आल्या असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शीपणे राबविली जात आहे.बंब यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

हर्षवर्धन जाधव यांना पाच कोटींचे आमिष?

कन्नडचे सेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्यासाठी पाच कोटी रुपयांचे आमिष दाखवल्याचा आरोप केला. कन्नड मतदारसंघातील रस्त्यांची कामे होत नसल्याने १७ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. मात्र, चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘तुम्ही भाजपमध्ये का येत नाही. तुम्ही राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक झाली तर त्याचा खर्च करू. त्यासाठी पाच कोटी रुपये देऊ,’ असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील म्हणाल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

मी या अनुषंगाने शासनाशी एप्रिल महिन्यात पत्रव्यवहार केला होता. ही तक्रार प्रधान सचिवांकडे केली होती. त्यानंतर त्यात बदल करण्यात आला. प्रतिकिलोमीटर तीन लाख रुपये असा त्यात बदल केल्याचे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात त्यावर केवळ २८ ते ३० हजार रुपये खर्च होतात. त्यामुळे या प्रकरणात गैरव्यहार झाले आहेतच. आता या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत, मात्र त्यात बरेच गोंधळ आहेत.

प्रशांत बंब, भाजप आमदार, गंगापूर

आता आमदारांना मतदारसंघात फिरणे मुश्कील झाले आहे. लोक आता अंगावर येत आहेत. त्यामुळे निधी मिळत नसल्याचे सांगण्यासाठी जाहिरात करावी लागली.

हर्षवर्धन जाधव, आमदार, शिवसेना