औरंगाबाद : औरंगाबादमधील भाजप सध्या दुटप्पी वागत असल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. उपमहापौर पदाचा विजय औताडे यांनी दिलेला राजीनामा आणि औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा आग्रह हा दुटप्पीपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान मराठवाडा आणि औरंगाबाद शहरातील कोणत्या समस्या मांडल्या, याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत दानवे बोलत होते.

गेल्या काही दिवसांतील भाजपकडून केल्या जाणाऱ्या आरोपाचा समाचार घेताना ते म्हणाले की, उपमहापौर औताडे यांनी राजीनामा दिला. मग स्थायी समिती, प्रभाग समितीमधून तसेच महिला बालकल्याण व आरोग्य समिती सभापतींनी का राजीनामा दिला नाही. त्यामुळे या सगळया प्रकाराला राजकीय वास येत आहे. एकप्रकारे राजकीय स्टंट केला जात आहे. त्याच्याकडे कोणी राजीनामा मागितला नव्हता. त्यामुळे महापौरांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे, अशी भूमिका भाजपचे नेते आता मांडत आहेत. माजी महापौर अनिता घोडले यांच्या कार्यकाळात असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. भाजपचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून का घेतला नाही. तेव्हा दुर्लक्ष केले. आजही शिवसेनेची मागणी कायम आहे. आम्ही ठाम आहोत. हे सरकार तीन पक्षाचे आहेत. त्याचा किमान समान कार्यक्रम ठरला आहे. त्यांच्या प्राधान्यानुसार हा निर्णय घ्यायचा की नाही, याचा विचार सरकार करेल, असे म्हणत या प्रश्नीही भाजप दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. त्यांना या प्रस्तावाची आताच का आठवण झाली, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तसेच नव्याने उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षातील नेत्यांशी चर्चा सुरू आहे. एकत्र बैठक घेऊन कोणत्या पक्षासाठी सत्तेतील वाटा कोणता, हे ठरवता येईल, अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार बैठकीस महापौर नंदकुमार घोडले यांची उपस्थिती होती.

मराठवाडय़ाला पाणी देण्याची मागणी

औरंगाबाद जिल्ह्यातील ३९९ महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यंपैकी १४० प्रकरणात शिक्षा सुनावली असून अशा गुन्ह्यंमध्ये न्यायालयीन प्रक्रियेला गती देण्याची गरज असल्याचे मत दानवे यांनी विधान परिषदेच्या कामकाजात मांडले. तसेच वैधानिक विकास महामंडळांनी विकास प्रक्रियेत अनुशेष हटविण्यासाठी फारसे योगदान दिले जात नसल्याचे सांगत त्यांनी मराठवाडय़ाला २९ अब्जघनफूट पाणी मिळावे, अशी मागणी केल्याचेही पत्रकार बैठकीत सांगितले.