औरंगाबादमध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. सोमवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ६२७ वर पोहचल्याचे प्रशासनाने सांगितले. औरंगाबाद शहरात गेल्या आठ दिवसांपासून सरासरी करोनाबाधितांचा आकडा १५ ते १७ असा येत आहे. मालेगावहून आलेल्या राज्य राखीव दलातील जवान एकाच वेळी बाधित झाल्याने शुक्रवारी संख्या अचानक शंभराने वाढली होती. वस्त्यांमधून करोना रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसून येत आहे

औरंगाबाद शहरात सोमवारी संध्याकाळी सात करोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ६२७ झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले आहे. या रूग्णांमध्ये जुना मोंढा, भवानी नगरमधील एक, जुना बाजार येथील चार आणि बेगमपुरातील दोन कोरोनाबाधित आहेत. तर शहरातील मनपाच्या किलेअर्क येथून ३६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील ११३ करोनाबाधित कोरोनामुक्त झाल्याचेही यावेळी प्रशासनाने सांगितले आहे.


घाटीमध्ये ४६ जणांवर उपचार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील घाटीच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल (डीसीएच) 46 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी ४२ रुग्णांची स्थिती सामान्य आहे. चार रुग्णांची स्थिती गंभीर आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

रामनगर, पुंडलिक नगरातील करोना बाधितांचा मृत्यू
पुंडलिक नगरातील ५८ वर्षीय पुरूष रुग्णास मिनी घाटीतून घाटीमध्ये ९ मे रोजी संदर्भीत करण्यात आले होते. त्यांचा अहवाल याच दिवशी पॉझिटिव्ह आलेला होता. संदर्भीत केल्यानंतर त्यांना तत्काळ घाटीच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. क्षयरोगामुळे फुफुसाचा एक भाग शस्त्रक्रिया करून काढण्यात आलेला होता. तसेच मेंदुचा क्षयरोग, मानसिक व झटक्याचा आजारही त्यांना होता. दोन्ही फुफुसांच्या न्युमोनिआमुळे त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण ६४ टक्के कमी झाले होते. म्हणून त्यांना कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला होता. परंतु ११ मे रोजी त्यांना सायं साडेचार वाजता तीव्र झटका आल्याने व कोविड आजारासह इतर आजार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  तर राम नगरातील ८०  वर्षीय कोविड पुरुष रुग्णाचाही आजच मृत्यू झाला. ताप, खोकला आणि दम लागत असल्याने त्यांना ८मे रोजी दुपारी घाटी रुग्णालयात भरती केले होते. त्यांचा ९ मे रोजी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर ८मेपासूनच कोविडसाठी अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. जास्त दम लागत असल्याने व शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांना १० मेपासून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु त्यांचे वय जास्त आणि न्युमोनिआ, श्वसनाचेही विकार होते. परंतु त्यांचाही उपचारादरम्यानच आज ११ मे रोजी मध्यरात्री एक वाजता मृत्यू झाला, असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले आहे.