सुहास सरदेशमुख

जागतिक बाजारपेठेत चीन आणि युरोपातील देशांमध्ये प्रतिकारशक्ती वाढविणारा पदार्थ म्हणून हळदीची मागणी वाढत असली तरी हिंगोलीतून दरवर्षीप्रमाणे बांगलादेशला मोठय़ा प्रमाणात हळद निर्यात केली जात आहे. या वर्षी हळदीची गुणवत्ता आणि भाव दोन्हीही चांगले आहेत. पाच हजार ७०० रुपयांपर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने हिंगोली, वसमत आणि नांदेड जिल्ह्य़ातील हळद तमिळनाडूमधील इरोड आणि निजामाबादहून बांगलादेशात पाठविली जात आहेत.

करोना विषाणू फैलावाच्या काळात हळद आणि आले या दोन्हींना चांगली मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून हळद खरेदीचा हंगामातील हा शेवटचा काळ आहे. मात्र अशी स्थिती राहिली तर हळद उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत साडेसहा लाख क्विंटल हळद या तीन जिल्ह्य़ांतून बाजारपेठेत दाखल झाली आहे.

सांगली, हिंगोली, वसमत आणि नांदेड येथील बाजारपेठा हळद व्यापारासाठी मोठय़ा मानल्या जातात. अलीकडच्या पाच वर्षांत हिंगोलीमध्ये हळद सौदे वाढले आहेत. करोना काळात हळदीची मागणी मात्र वाढत आहे. त्यामुळे हळदीचे भाव स्थीर राहतील, असे सांगण्यात येत आहे. हिंगोलीचे व्यापारी प्रकाश सोनी म्हणाले की, ‘तमिळनाडूतील इरोडमध्ये सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तेथून हळद निर्यात होते. विशेषत: बांगलादेशात होणारी निर्यात आता अन्य देशांतही होत आहे. निजामाबादहून वाघिणीने पाठविल्या जाणाऱ्या या हळदीच्या व्यापारात अद्याप तरी अडथळा आलेला नाही.’

याच क्षेत्रात गेली ४० वर्षे काम करणारे गजानन घुगे म्हणाले, जुलै हा खरे तर हळदीच्या बाजारपेठेसाठी मंदीचा कालावधी असतो. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे हळद आहे आणि चांगल्या प्रतीच्या हळदीचा भाव पाच हजार ७०० रुपयांपर्यंत आहे.’ हळद हे बागायती पीक असून चांगला पाऊस आणि पाण्याची उपलब्धता असणाऱ्या भागात ते घेतले जाते. तुलनेने मराठवाडय़ातील हिंगोली जिल्ह्य़ाची पावसाची सरासरीही इतर जिल्ह्य़ाच्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे हळद लागवडही वाढत आहे.

चीनमध्ये उद्योजक म्हणून भूमिका बजावणाऱ्या उद्योजकांशी अलीकडेच दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद कार्यक्रमात हळद आणि आले या दोन्ही पदार्थाची जागतिक पातळीवरील मागणी वाढली असल्याचे सांगण्यात येत होते. ही येत्या काळातील मोठी बाजारपेठ असू शकेल, असा दावाही केला जात आहे. हिंगोली जिल्ह्य़ात ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड आहे.

प्रति एकर ३० क्विंटलपर्यंत सरासरी उत्पन्न असल्याने या वर्षी लागवडीचा आकडा ५० हजार हेक्टपर्यंत जाऊ शकेल.

– विजय लोखंडे, कृषी अधीक्षक