करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काही हात राबाताहेत, आपल्या घरापर्यंत भाजी- धान्य यावी म्हणून. नाजिमभाई त्यांच्यापैकीच एक. जाधववाडीतील बटाटा व्यापाऱ्याकडे येणारे पोते उचलून त्याची थप्पी लावणे हे त्यांचे काम. गेली अनेक वर्षे सय्यद नाजिमभाईबरोबर काम करणाऱ्या १५० पैकी निम्म्या हमालांना काम मिळत नाही आणि मिळाले तरी ते क्षमतेपेक्षा कमीच. त्यामुळे रोज कमाई करून जगणारे सारे हैराण आहेत. वाट्टेल ते काम करायची इच्छा आहे पण कामच नाही, अशी स्थिती आहे.

नाजिम सय्यद कटकट गेटजवळ राहतात. घरात नऊ सदस्य. वृद्ध आई- वडील, मुले असा परिवार केवळ नाजिमभाईच्या मनगटातील जोरावर. पूर्वी दिवसाला ५०० रुपयांपर्यंत कमाई होत असे. परिणामी गृहस्थी चालविताना अडचण भासत नसे. गेल्या काही दिवसांतील टाळेबंदीमुळे जेथे एका व्यापाऱ्याकडे सात-आठ मालमोटारी कांदा-बटाटा उतरत असे, आता ही संख्या निम्म्यावर आली आहे. ज्यांना काम मिळते त्यांची चूल पेटते. जी मंडळी पोहोचू शकत नाहीत, त्यांचे हाल होतात,असे नाजिम सय्यद सांगत होते. देवचंद आल्हाट हेही धान्य बाजारात हमालीचे काम करतात. ते म्हणाले, ‘आता धान्याची आवक तशी कमीच आहे. पण किराणामालाच्या पॅकिंगच्या गाडय़ामध्ये माल चढविणे आणि उतरविणे हे काम सुरू आहे. सर्वाना ते मिळत नाही. त्यामुळे निम्म्याहून अधिक हमालांची कमाईच होत नाही. मग मिळेल तेथून रेशन घेण्यासाठी यांच्या घरातील मंडळी रांगा लावतात.’

आशाबाई डोके कचरावेचक. या क्षेत्रातील महिलांची मात्र ओढाताण सुरू आहे. शिवाजी नगरजवळील इंदिरा नगर झोपडपट्टीत त्या आणि त्यांचे पती राहतात. मुले आता स्वतंत्र झाली आहेत. ती वाळूज औद्योगिक पट्टय़ात राहतात. काबरा नगरमध्ये आशाताईंसारख्या अनेकजणी. त्यांचे काम आता पूर्णत: थांबले आहे. आशाबाई म्हणाल्या, ‘दुकाने सुरू असतील तर खपटे, काचा अशा वस्तू रस्त्यावर पडतात, पण ती बंद असल्याने सगळेच बंद पडले आहे. असे किती दिवस जाणार काय माहीत? ’ ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत, त्यांना तांदूळ मिळतो. पण ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे त्या सर्वाना धान्य मिळायला हवे, अशी त्यांची मागणी आहे. असंघटित क्षेत्रातील व्यक्तींच्या हक्कासाठी लढणारे सुभाष लोमटे म्हणाले, ‘खरे तर असंघटित क्षेत्रातील व्यक्तींच्या हितासाठी कागदावर खूप साऱ्या सूचना येत आहेत. पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नाही.’

कष्ट करणाऱ्याच्या हातात मिळणारा पैसा अर्ध्यापेक्षा कमी झाला आहे, तर अनेकांना रोजगारच नसल्याने सारे काही ठप्प झाले आहे. एका बाजूला अंतर ठेवून राहा असे सांगण्यात येत असले तरी भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी काही कमी झालेली नाही.