जायकवाडीतून विसर्ग, शेतीचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाडय़ात गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगाम आता पूर्णत: हातचा गेल्याचे चित्र दिसत असून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी शनिवारी दादा भुसे यांनी केली. सोयाबीनच्या उभ्या शेतातच शेंगांना मोड आले आहेत. परिणामी हाती काही येणार नाही, असे चित्र दिसत असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीच्या निकषानुसार मदत देण्यात येईल, असे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. दरम्यान औरंगाबाद शहरासह मराठवाडय़ातील २१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. औरंगाबाद शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. खुलताबाद पोलीस ठाण्यातही पाणी घुसल्याचे वृत्त आहे. दरम्यान जायकवाडी धरणातून शनिवारी दुपारी १८ दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले तर नऊ आपद्कालीन गेट उघडून ८९ हजार ६०४ प्रतिसेकंद दराने गोदावरी नदी पात्रात विसर्ग करण्यात आला. गोदावरीचे पात्र तुडुंब असल्याने शेतीचे नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी रात्री औरंगाबाद शहरात पाऊस कोसळत राहिला. उशिरापर्यंत पडलेल्या या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते जणू नदीपात्र वाटावेत, एवढे पाणी साठले होते. वाळुज औद्योगिक वसाहतीमधून परतणाऱ्या कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागले. गेल्या काही दिवसापासून सतत पडणाऱ्या पावासामुळे रस्त्यांची चाळण झाली असून कृषिमंत्र्याचा दौऱ्याचा मार्ग खराब रस्त्यामुळे वैजापूरऐवजी कन्नड असा करावा लागल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान कोणत्या पिकांचे नुकसान अधिक आहे, याचा आढावा कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सादर केला. तसेच कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनीही नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी पुन्हा पावसाच्या हलक्या सरी सुरूच असल्याने ‘आता थांब रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मृत्युसंख्या ४८ वर

नैसर्गिक आपत्तीमुळे वाहून गेलेल्या आणि भिंत पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या ४८ एवढी झाली असून प्रशासनाकडून ३७ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत. १५ जणांना मदत करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात सर्वाधिक ११ जणांचा पावसामुळे वाहून गेल्याने मृत्यू झाला. जवळपास १७२ दुधाळ जनावरे वाहून गेल्याचे अहवाल शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावासामुळे घरे पडल्याचेही अहवाल आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत पावसामुळे ३३ टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे १४ हजार ८६८ शेतकरी असून  सात हजार २३४ हेक्टरावरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या ८६ हजार ४७१ असून ३४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे अहवाल कळविण्यात आले आहेत.  सप्टेंबरच्या बाधित क्षेत्राची आकडेवारी वाढत असून ती माहिती एकत्रितपणे द्यावी, असे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.