करोना संसर्गाचे संकट समोर असताना राज्यामध्ये रक्त तुटवडय़ाची चणचण आरोग्य विभागाला भासत असून त्याचा थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या कुटुंबीयांना नवा घोर लागला आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना साधारण दर १५ ते ३० दिवसांच्या फरकाने अंगात रक्त चढवण्याची अत्यंतिक गरज असते. असे औरंगाबादेत एक हजारांवर तर मराठवाडय़ात चार हजारांवर रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांच्या कुटुंबीयांना रक्त मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी रक्तपुरवठय़ाची व्यवस्था औरंगाबादेत डॉ. दत्ताजी भाले रक्तपेढीसह जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आदी ठिकाणांहून केली जाते. याशिवाय काही सामाजिक संघटनाही थॅलेसेमियाग्रस्तांसाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतात. थॅलेसेमियाच्या रुग्णांना वेळेत रक्त मिळाले नाही तर ते जिवावरही बेतण्याची शक्यता असते. मुळात अशा मुलांचे आयुष्य साधारण १५ ते २० वर्षे असते. या कालावधीत अशा रुग्णांच्या अंगात तब्बल २५० पेक्षा जास्त वेळा रक्त चढवावे लागते. याशिवाय इतरही चाचण्या करून त्यांच्यावर उपचार करावे लागतात.

दर १५ ते ३० दिवसांच्या फरकात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्त द्यावे लागते. औरंगाबाद शहरात थॅलेसेमियाग्रस्त मुलांची संख्या एक हजारांच्या वर असून मराठवाडय़ात हा आकडा चार हजारांपेक्षाही अधिक आहे. तर देशात ७ टक्के म्हणजे साधारण १० कोटीपर्यंत संख्या असल्याची माहिती थॅलेसेमिया सोसायटीकडून मिळाली आहे.

या आजाराबाबत डॉ. दत्ताजी भाले रक्तपेढीचे उपमुख्य व्यवस्थापकीय वैद्यकीय संचालक डॉ. महेंद्रसिंग चौहान म्हणाले,की हा अनुवांशिक आजार असला तरी आता काही रुग्ण थॅलेसेमियामुक्तही होत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. औरंगाबादेतही सध्या असे एक उदाहरण आहे. हा आजार अनुवंशिक असून कायमस्वरुपी उपचार म्हणून बोनमॅरो प्रत्यारोपणाचा एक पर्याय समोर आला आहे. हा पर्याय काहीसा खर्चिक आहे. साधारण २० लाख रुपयांपर्यंतचा खर्च त्यासाठी येतो. मात्र मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यासाठी दोन लाख रुपयांची मदत मिळते. पण ती अत्यंत तोकडी आहे. या मदतीत मोठी वाढ करण्याची मागणी थॅलेसेमिया सोसायटीने केली आहे. तसे झाले तर अनेक थॅलेसेमियाग्रस्तांना जीवदान मिळू शकते. शहरातील रुग्णांची व्यवस्था होत असली तरी अन्य भागातील रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी खासे प्रयत्न करावे लागतात. औरंगाबादेत काही डॉक्टर, सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून आम्ही एक चळवळ उभी केली असून त्या माध्यमातून मदतीसाठी अनेक जण पुढे येतात.

थॅलेसेमियाग्रस्त मुलांची वाढ खुंटते. शरीरात लाल रक्तपेशीच तयार होत नाहीत. साधारण लाल रक्तपेशी या शरीरात ऑक्सिजन वहनाचे काम करतात. तसेच हिमोग्लोबीन तयार करण्याचेही काम या रक्तपेशींचेच असते. अशा रुग्णांची प्रतिकारशक्तीही कमीच असते. बोन मॅरो हा हाडांमधील एक द्रव असतो. आई किंवा वडिलांचा बोनमॅरो रुग्णाशी जुळण्याची शक्यता अधिक असते. यासंदर्भातील शस्त्रक्रिया हा कायमस्वरुपी आजारातून मुक्ती मिळवण्याचा उपाय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना वेळेत रक्त मिळावे, यासाठी आम्ही काही दात्यांचा चमू तयार केलेला आहे. साधारण शंभर ते एक हजार लोक नियमित दर तीन महिन्यांनी रक्तदान करणारे आहेत. त्यांच्या माध्यमातून रुग्णांच्या रक्ताची व्यवस्था होते.

– केदार जोशी, डॉ. दत्ताजी भाले रक्तपेढी.