कोल्हापूर व सांगलीत उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे विस्कळीत झालेली वीजयंत्रणा पूर्ववत करण्यासाठी कोल्हापूर परिमंडलाच्या मदतीला औरंगाबाद परिमंडल धावले आहे. औरंगाबाद परिमंडलातून शनिवारी दोन ट्रकमध्ये १२ रोहित्रे व सामग्री कोल्हापूरकडे पाठवण्यात आली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी कोल्हापूर व सांगलीला मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामग्री पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांनीही याबाबत औरंगाबाद, नांदेड व लातूर परिमंडलाच्या अधिकाऱ्यांना आवाहन केले. त्यावर तिन्ही परिमंडलानी सकारात्मक प्रतिसाद देत रोहित्रे व आवश्यक साधनसामग्री कोल्हापूरकडे पाठवली आहे.

औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी तातडीने दोन ट्रकमध्ये तंत्रज्ञांसह २०० केव्हीए क्षमतेची १२ रोहित्रे शनिवारी कोल्हापूरकडे रवाना केली. गणेशकर यांनी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्याशी फोनवर चर्चा करून अभियंते व कर्मचाऱ्यांची पथके पाठवण्याचीही तयारी दर्शवली.

मात्र, सध्या मनुष्यबळाची आवश्यकता नसल्याने केवळ साधनसामग्री पाठवण्यात आली आहे. तथापि, आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी अभियंते व कर्मचाऱ्यांची १० पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आल्यास तातडीने ती पथके कोल्हापूर व सांगली येथे पाठवण्यात येतील, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.