मराठवाडय़ातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाडय़ाला देण्याच्या अनुषंगाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून त्या अनुषंगाने निविदा काढाव्यात, अशी मागणी शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या नदीजोड प्रकल्पासाठी १५ हजार कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज आहे.

सिंचनाचा पेच सोडविण्यासाठी कोणकोणत्या भागातून पाणी मिळू शकते याची आकडेवारी एकत्रित करण्यात आली होती. त्यानुसार मराठवाडय़ातील ७६ पैकी ५३ तालुके अवर्षणग्रस्त आहेत. मराठवाडय़ाला राज्याला मिळालेल्या उपलब्ध पाण्यापैकी ४९.१० टीएमसी पाणी मिळणे अपेक्षित होते. आजपर्यंत मराठवाडय़ाला केवळ २५.४ अब्ज घनफूट पाणी मिळालेले आहे. कृष्णा खोऱ्यातील २३.७ टीएमसी पाण्यापैकी केवळ सात टीएमसी पाण्याचे प्रकल्पच मंजूर होतील, असे ठरविण्यात आले होते. याशिवाय कृष्णा खोऱ्याबाहेरील १४ टीएमसी पाणी लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ास मिळणे आवश्यक आहे. असे केले तरच मराठवाडय़ाचे प्रश्न मिटू शकतात. वैनगंगा व प्राणहिता उपखोऱ्यातील पाणी स्थलांतरित करावे तसेच उध्र्व पैनगंगा धरणात व येलदरी धरणात ३४ अब्ज घनफूट पाणी अधिकचे द्यावे, अशी विनंती जयदत्त क्षीरसागर यांनी एका पत्रान्वये केली आहे.  महाराष्ट्रातल्या सिंचनाची बरोबरी करायची असल्यास मराठवाडय़ात इतर खोऱ्यातून पाणी वळवावे. तसेच अनुशेषाचे कमीत कमी ५०० कोटी रुपये प्रतिवर्षी व मागील नऊ वर्षांचा हिस्सा मिळावा अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे. अशा पद्धतीने सिंचनाचे प्रश्न सोडविले तरच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असेही क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.