सुहास सरदेशमुख

करोना काळात आक्रसलेल्या उद्योगाचे चाक सप्टेंबरपासून गती घेताना दिसत असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबपर्यंत वस्तू व सेवा करातील तूट ४४२ कोटी रुपयांची आहे. गेल्या दोन महिन्यात राज्याच्या वस्तू व सेवा कराचा हिस्सा वाढत आहे. मार्च अखेपर्यंत वाढीचा हा आलेख कायम राहील, असा अंदाज आहे. या काळात कंपन्यामधील उत्पादक साखळीत बरेच बदल घडले. औरंगाबाद विभागात वाहन उद्योग, मद्या उत्पादन तसेच जालना जिल्ह्य़ात पोलाद उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. औषध निर्माण क्षेत्रातील ५० हून अधिक कंपन्या औरंगाबाद येथे आहेत. गेल्या दोन महिन्यात विक्री आणि उत्पादनात वाढ दिसून येत होती. त्याचा परिणाम म्हणून वस्तू व सेवा करामध्येही ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये वाढ दिसून येत आहे. वस्तू वापरातही बरेच बदल दिसून येत आहेत. त्यात आरोग्यविषयक बाबींचा समावेश अधिक आहे.

मार्चपासून टाळेबंदी लागू झाली तेव्हा एप्रिलमध्ये जमा होणाऱ्या वस्तू व सेवा कराची रक्कम घसरत गेली. घसरणीचा आलेख नोव्हेंबपर्यंत कायम होता. तत्पूर्वी दुचाकी इंजिन बदलाबाबत केंद्र सरकारने ठरविलेले नवीन नियम आणि मंदीसदृश स्थिती यामुळे वस्तू व सेवा कराचा हिस्सा  एप्रिल २०१९ मध्ये २०३ कोटी ३२ लाख रुपये होते ती टाळेबंदीनंतर ६९ कोटी ८५ लाख कर संकलन झाले. ती घसरण १३३ कोटी ४७ कोटी रुपये एवढी होती. पुढे जूनमध्ये घसरण काहीशी कमी म्हणजे १०५ कोटी ६६ लाखापर्यंत गेली.

सप्टेंबरमध्ये विक्रीमध्ये वाढ होत गेली. तूटही कमी होत गेली. ती केवळ १२ कोटी रुपयांवर गेली. ऑक्टोबरमध्ये कर संकलनाचा कल आणि बाजारपेठ अधिक बदलत गेली तसे ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्यांदा वस्तू व उत्पादन सेवा कर १३ कोटी ८ लाखाने वाढली. नोव्हेंबरमध्येही वाढीचा कल कायम राहिला. नोव्हेंबरमध्ये ही वाढ २९.४१ कोटी रुपये एवढी आहे तर महिन्यातील कर संकलन १६५ कोटी ७४ लाख एवढे झाले होते.

तुलानात्मक आकडेवारी

* औरंगाबाद विभागातून मद्य, वाहन व सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीतून  २०१९ मध्ये १३४२.३८ कोटी रुपये वस्तू व सेवा कर होता. या वर्षी नोव्हेंबर ८७०.७६ कोटी रुपये कर संकलन झाले. येत्या तीन महिन्यात त्यात वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

* वेगवेगळ्या देशातून येणाऱ्या टाळेबंदीच्या माहितीमुळे अर्थचक्राचा आलेख पाहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनात शंका असल्या तरी बाजार आता तेजीत असल्याने मिळणारा कर मार्चपर्यंत गेल्या वर्षी एवढा होईल असे सांगण्यात येत आहे.

प्रमुख उद्योगाचे कर संकलन पुण्यातून

वाहन उद्योगातील औरंगाबादमधील प्रमुख कंपन्यांचे कर संकलन आता पुणे जिल्ह्य़ात होते. त्यामुळे मराठवाडय़ातील बजाज आणि स्कोडासारख्या मोठय़ा उद्योगातून होणारे कर संकलन तुटीची दरी अधिक वाढविणारी आहे.