जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून लोकांना पिण्याचे पाणी नाही. जनावरांना चारा नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आíथक अडचणीत आहेत. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली. सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गवगवा केला; परंतु कामे अर्धवट स्थितीत असून ज्या ठिकाणी कामे करायला पाहिजे तेथे ही कामे झाली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून पक्षाचे माजी मंत्री राज्याच्या दुष्काळी भागात दौरे करीत आहेत. मोघे यांनी मुखेड, कंधार, नांदेड दक्षिण भागात दौरा केला. त्यानंतर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना निवेदन सादर केले. जि. प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा किशोर स्वामी, आमदार अमरनाथ राजूरकर, डी. पी. सावंत व वसंतराव चव्हाण, बी. आर. कदम, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर, माधवराव जवळगावकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, उपमहापौर शमीम कुरेशी आदींची उपस्थिती होती.

जलयुक्त शिवारची कामे अर्धवट निकृष्ट दर्जाची झाली असून, जलयुक्त शिवारच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, ते कामही अर्धवट असल्याचे राजूरकर यांनी निदर्शनास आणून दिले. कंधार जगतुंग तलावातील गाळ काढल्यास परिसरातील २५ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याची घोषणा केली; परंतु बँक अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत, ही बाब माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी जिल्हाधिकारी काकाणी यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच पुनर्गठणाची मुदतही वाढवण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर अंतापूरकर, गिरीधर डाकोरे, जनार्दन बिरादार, व्यंकटराव गुजरीकर आदींच्या सह्य़ा आहेत.

राजूरकरांचा हल्लाबोल

माजी मंत्री मोघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन सरकार व प्रशासनाने चालविलेल्या धुळफेकीवर जोरदार हल्ला चढविला. कंधार तालुक्यातील अंबुलगा येथे झालेल्या कार्यक्रमात प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर यांनी हा हल्लाबोल केला. दुष्काळ निवारणासाठी कुठेच ठोस काम होत नाही, याचे अपयश आपल्या माथी लागेल, असे लक्षात येताच शासनकर्त्यांनी रामनवमीसारखे उत्सव, भारत माता की जय नारा देणे, आरक्षणावर वादग्रस्त विधाने असे उपद्व्याप सुरू केले. हे सरकार सामान्यांचे नव्हे तर केवळ शेठजी-भटजींचे आहे, अशी टीका त्यांनी केली.