उच्च न्यायालयाकडून प्रशासनाला विचारणा

औरंगाबाद : करोना लढय़ात उतरण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली तसेच नक्की कोणती पाऊले उचलली जात आहेत, याची पाहणी करण्याची इच्छा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी सुनावणी दरम्यान व्यक्त केल्यानंतर प्रशासानाने कारवाईचा एकत्रित आढावा शुक्रवारी एका पत्रकार बैठकीतून मांडला. दरम्यान शहरातील करोना रुग्णांच्या संख्येत आज २०० रुग्णांची वाढ झाली. उपचारादरम्यान २७९ जणांचा मृत्यू असून सध्या विविध रुग्णालयात २ हजार ९६९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

औरंगाबाद शहरात टाळेबंदीमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर एका दुचाकीवर तिघे बसतात, मुखपट्टी न लावता फिरतात मग कारवाई का केली जात नाही, अशीही विचारणा उच्च न्यायालयाने केली. मराठवाडय़ातील करोनाबाबतच्या कार्यवाही संदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व नाशिक आयुक्तांनी शपथपत्र दाखल केली आहेत. तसेच औरंगाबाद  जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही शपथपत्र दाखल केले आहे. करोना संदर्भात प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीवर विविध अंगांनी टीका होऊ लागल्यानंतर प्रशासकीय पातळीवर कशी कारवाई केली जात आहे याची माहिती प्रसार माध्यमांनाही देण्यात आली.

लक्षणे नसणारे, सौम्य लक्षणे असणारे व गंभीर लक्षणे असणाऱ्या करोनाबाधितांसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्यासाठी नव्याने आरोग्य सुविधा वाढविण्यात येत आहेत.  चिकलठाणा औद्योगिक वसतिगृह कोवीड उपचार केंद्रासाठी ताब्यात घेण्यात आले. या वसतिगृहातील ८० खोल्यामध्ये २५० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. वीज, पाणी, सीसीटिव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा उभी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पीईएस महाविद्यालयात १२३ खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.  दोन दिवसात हे केंद्र सुरू होणार आहे. दरम्यान  रुग्ण लवकर आरोग्य केंद्रामध्ये आल्यास त्यावर उपचार करणे शक्य होते. मृत्यूचे प्रमाण रोखणे हेच आता उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.  दरम्यान उच्च न्यायालयानेही करोना उपचारासाठी सुरू असणाऱ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रसंगी काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असेही युक्तिवादा दरम्यान म्हटले. या प्रकरणी न्यायालयीन मित्र म्हणून काम करणारे अ‍ॅड. राजेश देशमुख यांनीही या वृत्तास दुजोरा दिला.

टाळेबंदीचा सोमवारी निर्णय

शहरातील वाढती रुग्णसंख्या आणि आरोग्य सुविधा यांचा ताळमेळ घालता यावा म्हणून सोमवारी लोकप्रतिनिधींसमवेत बैठक होणार असून त्यामध्ये कडक  टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान टाळेबंदीमधील शिथिलता म्हणजे पूर्णत: मोकळीक अशी वर्तणूक सुरू असल्याने पोलिसांनीही आता नव्याने कारवाईला सुरुवात केली आहे. मुखपट्टी न बांधणारे आणि दुचाकीवर तीनजण बसणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली.

जालना शहरामध्ये उद्यापासून टाळेबंदी

जालन्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असून वाढता प्रादुर्भाव रोखून विषाणूची साखळी तोडण्यासाठी पदाधिकारी, प्रशासन व जनता यांनी एकत्रित येऊ न रुग्ण वाढीची साखळी तोडण्यासाठी रविवारी (५ जुलै) रात्री बारापासून संपूर्ण जालना शहरामध्ये दहा दिवसांसाठी टाळेबंदी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका बैठकीत दिली. यावेळी आमदार कैलास गोरंटय़ाल, नगराध्यक्षा  संगीता गोरंटय़ाल, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  निमा अरोरा यांच्यासह नगरपालिकेचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पाच जणांचा मृत्यू

शहरातील पाच जणांचा करोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. अरुणोदय कॉलनी, लोटाकारंजा, जुना बाजार आझम कॉलनी येथील शहरातील तीन जणांचा तर शळूदचाठा व अजिंठा येथील एकाएकाचा मृत्यू झाला. या सर्वाना अन्य आजार होते. गंभीर अवस्थेतून बाहेर काढत तीन जणांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात १३७ रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.  विविध शहरांमध्ये केले जाणार आरोग्य विषयक प्रयोग औरंगाबाद येथेही केले जात असल्याचा दावा केला जात आहे.

परभणी जिल्ह्यात आणखी ७ रुग्ण वाढले

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी भागासह काही ठिकाणी संचारबंदी लावलेली  असताना शुक्रवारी सायंकाळी परभणीतील ६ रुग्णांचा करोना अहवाल सकारात्मक आला तर मुंबई येथे स्राव देऊन मानवत तालुक्यातील ईरळद येथे वास्तव्यास  आलेल्या एका रुग्णाचा करोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३० झाली आहे. या आठवडय़ात सातत्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या नागरी भागात रविवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी  लागू करण्यात आलेली आहे.

मराठवाडय़ातील रुग्णसंख्या

जिल्हा             एकूण रुग्णसंख्या     बरे झालेले रुग्ण                मृत्यू

औरंगाबाद –            ६,२३३                 २,९६९                                २७९

जालना-                  ६४८                       ३६८                                   २०

परभणी –                १२३                      ९४                                     ०४

हिंगोली –                २७७                      २४०                                    ००

नांदेड –                   ४०१                       २९७                                    १८

बीड-                      १२९                        ११३                                    ०३

लातूर-                     ४००                       २०७                                     १९

उस्मानाबाद-          २४५                        १७८                                       १२

एकूण                   ८,४५६                     ४ ,४६६                                   ३५५