औरंगाबाद : योगी आदित्यनाथ जेवढे प्रखर हिंदुत्ववादी आहेत. तेवढीचं प्रखरता आपल्या अंगी असल्याचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. औरंगाबादमध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय वैदिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

संसदेत प्रश्न उपस्थित करताना शिवसेनेचा खासदार म्हणून हिंदुत्ववादी भूमिका मांडा असे योगी आदित्यनाथ म्हणायचे. ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. मी देखील शिवसेनेचा उत्तर प्रदेशचा प्रभारी आहे, असे सांगत योगी आदित्यनाथ यांच्या एवढीच हिंदुत्ववादी प्रखरता आपल्या अंगी असल्याचं खैरे यावेळी म्हणाले.

निवडणुकीच्या आखाड्यात खैरे यांचे हिंदुत्व हे महत्वाचे अस्त्र आहे. वैदिक संमेलनात केंद्रिय मंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी स्वतःशी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी तुलना करून त्याला धार दिली आहे. वैदिक संमेलनाच्या माध्यमातून खैरे यांची राजकीय बांधणी सुरु असून येणाऱ्या काळात अधिक प्रखर पद्धतीने हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणला जाईल असे बोलले जात आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतराची चर्चा गेल्या आठवडाभरात जोर धरून आहे. जिल्हयाचे माजी पालकमंत्री रामदास कदम यांनी या मुद्द्यावर खैरे यांना फटकारले होते. आज वैदिक संमेलनाच्या व्यासपीठावरून केंद्रिय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिहं यांनी देखील औरंगाबादचे नाव बदलायला हवे असे बोलून दाखवले. सत्यपाल सिहं भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांनी औरंगाबाद असा शहराचा उल्लेख केला. त्यावर प्रेक्षकांमधून संभाजीनगर असे सांगण्यात आले. यावर सिहं यांनी संभाजीनगर असे म्हणत शहराचे नाव बदलायला हवे असे मत मांडले.