News Flash

तुळजाभवानीचे दागिने कर्मचाऱ्यांकडून लंपास!

सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांचे नाव आहे.

चौकशी अहवाल सादर, फौजदारी कारवाईची शिफारस

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील मौल्यवान माणिक, दोन चांदीचे खडाव आणि वेगवेगळय़ा राजेरजवाडय़ांनी दिलेली ७१ पुरातन नाणी मंदिर संस्थानच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गायब केली असल्याचा अहवाल एका समितीने जिल्हाधिकारी तसेच विधिमंडळास कळविला आहे.

या प्रकरणी मंदिरातील धार्मिक काम पाहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पदभार देताना आणि घेताना कागदोपत्री नोंदीत घोळ घालून या मौल्यवान वस्तू गायब केल्या असल्याने या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याची शिफारस वरिष्ठ अधिकारी पराग सोमण प्रमुख असलेल्या समितीने केली आहे. तुळजापूर येथील पुजारी किशोर गंगणे आणि त्यांचे वकील शिरीष कुलकर्णी यांनी खजिन्यातील अनागोंदी कारभाराविषयी तक्रारी केल्या होत्या.

१४ फेब्रुवारी १९८० ते ५ मार्च १९८१ या कालावधीमध्ये पदभार देणारे तत्कालीन उपव्यवस्थापक अंबादास यशवंतराव भोसले व त्या वेळी पदभार स्वीकारणारे यांनी घेतलेल्या पदभारावेळी सोने, चांदी, भांडीपात्र, चांदीच्या वस्तू व पुरातन नाण्यांचा उल्लेख आहे. मात्र, या अनुषंगाने केलेल्या पाहणीमध्ये अनेक पुरातन नाणी दिसून येत नसल्याचे समितीने अहवालात नमूद केले. सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी मौल्यवान वस्तूंबाबत कोणताही कायदेशीर पदभार नसतानाच मौल्यवान वस्तू हाताळल्या. तसेच खजाना पेटीच्या ११ चाव्यांपैकी तीन चाव्याच हरविल्या असल्याचेही दिसून आल्याची निरीक्षणे या अहवालात नमूद करण्यात आली आहेत.

सोन्या-चांदीच्या नोंदीचे घोळ

तुळजाभवानी मंदिरातील सहायक व्यवस्थापकांनी एक किलो ८५१ ग्रॅम व ५२० मिलिग्रॅम सोने व २० किलो ८०० ग्रॅम ९०० मिली ग्रॅम चांदीचे दागिने बेकायदेशीरपणे महंताकडे दिल्याच्या नोंदी आहेत. मात्र, एवढे मौल्यवान दागिने हस्तांतर करताना मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांना अंधारात ठेवले. पदभार देताना कोणत्या वस्तू, त्याचे वजन किती याची कोणतीही यादी अद्ययावत करण्यात आली नाही. महंताकडील यादीही उपलब्ध नसल्याने ती प्रक्रिया स्वतंत्रपणे करण्यात यावी, अशी शिफारसही करण्यात आली आहे. सर्व दागिने महंत हाताळतात तेव्हा मंदिर समितीमधील कर्मचारी उपस्थित नसतो. त्यामुळे हा सगळा कारभारच संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. या प्रकरणात आदेश दिल्यानंतरही कारवाई करण्यात आली नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दोष ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांचे नाव आहे. २००१-२००५ या कालावधीमध्ये धार्मिक विभागाचे व्यवस्थापक नक्की कोण, हेच कागदोपत्री स्पष्ट होत नसल्याचे दिसून आले असून या सर्व गोष्टी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाला कळविण्यात याव्यात, असे समितीने म्हटले आहे.

कोणती नाणी गायब? :

बिकानेर संस्थान-४, औरंगजेब-१, डॉलर-६, चित्रकूट, उदयपूर संस्थान-३, जुलस-१, शहाआलम इझरा-४, बिबा शुरुक-१, फुलदार-१, दारुल खलिफा-१, फत्ते औरंगाबाद औरंगजेब आलमगीर-१, इंदूर स्टेट सूर्यछाप-१, अकोट-२, फरुखाबाद-१, लखनऊ-१, पोर्तगीज-९, इस्माईल शहा-१, बडोदा-२, रसुलइल्ला अकबर व शहाजहँान-४, जुलस हैदराबाद-५, अनद नाणे-२० अशी वेगवेगळ्या संस्थांनातील राजे-रजवाडेंनी तुळजाभवानीला अर्पण केलेली सोन्याची व अन्य धातूंची नाणी गायब आहेत.

झाले काय? :

तुळजाभवानीच्या अंगावरील दागिने ठेवण्यासाठी एकूण पाच पेटय़ा आहेत. त्यातील पेटी क्रमांक चारमध्ये ११ अलंकार असल्याची यादी होती. मात्र, त्यात चांदीचे जडाव म्हणजे पादुका तपासणी समितीला गायब असल्याचे दिसले. तसेच पेटी क्र. पाचमधील अलंकार छत्र जडावी काडीसह मौल्यवान माणिक पळवून नेल्याचे दिसून आले. सोने-चांदी, मौल्यवान दागिने याबाबत मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी घेतलेले पदभार बेकायदेशीर असल्याचे समोर आले. या प्रकरणात दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 2:20 am

Web Title: jewelry from tulja bhavani temple stolen by employee zws 70
Next Stories
1 शिवसेनेची ताकद वाढली, पण वाटा मिळणार का?
2 औरंगाबादचे पाच हजारांवर श्वान मृत्युपंथावर
3 खुनाच्या गुन्ह्य़ातील १४ जणांना मोकाअंतर्गत कोठडी
Just Now!
X