कापूस उत्पादनात घट झाल्याने जिनिंग मिलमध्येही शुकशुकाट

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

‘जेव्हा जेव्हा हवामान खात्याने पाऊस येईल, अस भाकित वर्तवले तेव्हा तेव्हा न वाढलेले पीक काढून टाकले. नव्याने पेरणी केली. तीनदा झाले असे. पण हाती काही आले नाही’, असे पाच एकराचे मालक संजय साताळकर हताशपणे सांगत होते. ‘पुढे काय होणार, तर कर्ज वाढणार.’ ठिबक सिंचन आणि मोटारीसाठी त्यांनी दोन लाख ४० हजार रुपये कर्ज घेतले होते. ९० हजारांचे पीक कर्ज होते. कर्जमाफीसाठी अर्ज भरला होता. अर्ज मंजूरही झाला. पण उरलेली रक्कम भरली तरच लाभ मिळणार होता. ती रक्कम हाताशी नव्हती. त्यांच्या डोईवर कर्ज आहे ते आहेच. आता त्यात भर पडणार आहे. वैजापूर तालुक्यातील दुष्काळी पट्टय़ात साताळकरांसारखे अनेक शेतकरी. प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज. कर्ज वाढत जाण्याची ही प्रक्रिया फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित राहिली नाही तर त्याचा परिणाम व्यापारावरही झाला आहे. त्यांच्याही डोक्यावरचे कर्ज वाढतेच आहे.

मराठवाडय़ात बहुतांश कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. साताळकरांनी दोन एकर कापूस, एक एकर मका, दहा गुंठे भुईमूग ही पिके लावली होती. दोन वर्षांपूर्वी मुलींचे लग्न झाले. दोन्ही मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढावेच लागले होते. आता तिसरी मुलगी आठवीत आहे. कापसासाठी ठिबक घेऊ, अधिक उत्पादन करू म्हणून बँक ऑफ इंडियाचे ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले. आता पाऊसच नाही. त्यामुळे ठिबकच्या प्लास्टिकच्या नळ्या त्यांनी गुंडाळून ठेवून दिल्या. तीन वेळा पेरणी करूनही हाती काही न आल्याने हताश झालेले साताळकर सांगत होते- ‘मी काही एकटा असा नाही. अख्खा गाव होरपळला आहे. सर्वाचे जसे होईल, तसे माझेही होईल. या वर्षी कर्ज वाढणार हे नक्की.’

मराठवाडय़ाच्या सीमेवर नाशिक जिल्ह्य़ातील बोलठाण या गावातून बहुतांश शेतकरी बियाणे आणि खत आणतात. रमेश रिंढे यांच्या दुकानातून आणलेले खत शेतकऱ्यांनी परत केले. रिंढे सांगत होते, ‘पाऊस न आल्याने विकत घेतलेले खत शेतकऱ्यांनी आम्हाला परत आणून दिले. वर्षांनुवर्षांचे आमचे संबंध आहेत. म्हणून ती आम्ही परत घेतली. आता ४० लाख रुपयांचा खत आणि औषधांचा साठा माझ्याकडे पडून आहे. शेतीशी संबंधित बहुतांश व्यवसायात आम्ही आहोत. सगळीकडे तोटाच आहे.

या वर्षी आमचेही कर्ज वाढेल.’ वैजापूर तालुक्यातील जिरी, मनोली, कविटखेडा, बळेगाव, विरोळा या दुष्काळी गावांमध्ये आता वाढत्या कर्जाची चर्चा आहे. शेतीतले नुकसान आणि टँकरची प्रतीक्षा असा दिवस येतो आणि जातो. टँकर आलाच तर गावात थोडीफार धावपळ होते. अन्यथा सारेजण कुठेतरी पारावर एकत्र बसतात. हाताला काम नसल्यामुळे परत घरी जातात. बहुतांश शेतकऱ्यांची मागणी आहे, ‘आमच्या हाताला काम द्या.’

याच भागात शिऊर बंगला नावाच्या गावाजवळ जिनिंग मिल आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे उत्पादन घटले होते. या वर्षी जिनिंग मिलमध्ये अक्षरश: शुकशुकाट आहे. जिनिंग मिलचे मालक वर्मा म्हणाले, ‘शेतकऱ्यांना तातडीने पैसे लागतात म्हणून आम्हीदेखील कर्ज घेतो. या वर्षी भावही चांगला आहे. सहा हजार क्विंटलपर्यंत भाव जाईल, पण शेतात काही आलेच नाही. अगदी पहिली-दुसरी वेचणी झाली की कापूस संपून जातो. जिथे ट्रकने माल यायचा, तिथे पोत्यानेसुद्धा माल येत नाही. या वर्षी शेतकरी तर हैराण आहेच, आम्हालाही व्यवसाय वाढवता येणार नाही.’ गुजरात आणि आंध्र प्रदेशापर्यंत कापूस विक्री करणाऱ्या बहुतांश जिनिंग मिल महिनाभरसुद्धा चालतील की नाही, अशी शंका व्यापाऱ्यांना आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा

मराठवाडय़ातील जायकवाडी, येलदरी, माजलगाव, मांजरा, तेरणासह १३ प्रकल्पांमध्ये २३ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या नोंदीनुसार ३१.६४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ६६.५७ टक्के पाणीसाठा होता. आजघडीला १३ प्रकल्पांमध्ये १६३०.२ उपयुक्त पाणीसाठी आहे. गतवर्षी ३४३०.०० उपयुक्त साठा होता. मराठवाडा विभागाची १ जून ते ३१ ऑक्टोबपर्यंत सरासरी ७७९ मिमी पर्जन्यमान आहे. तर १ जून ते २३ ऑक्टोबरपर्यंत सरासरी ७६२.२५ मिमी पर्जन्यमान नोंदवले गेले आहे. मराठवाडा विभागात कापूस लागवडीचे अपेक्षित क्षेत्र १७७६२.०५ हेक्टर असून प्रत्यक्षात १५८१२.३८ हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. लागवडीची टक्केवारी ८९.०२ असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.