करोनामुळे नोकऱ्या धोक्यात, अर्थकारणाचा गाडा थांबला

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

अब्रार रझाक यांना आयुष्य आता अजिंठा लेण्यांच्या कडय़ावरून दरी सारखे दिसू लागले आहे. गेली दोन वर्षे औरंगाबाद- जळगाव रस्ता नसल्याने पर्यटक येत नव्हते. त्यामुळे गतीमंद झालेला अर्थकारणाचा गाडा आता पूर्ण थांबला आहे. नऊ  जणांचे कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे अजिंठा परिसरात दहा गाईड आहेत. डोलीवरून पर्यटकांना नेणारे, छोटी-मोठी खेळणी, स्फटिकांच्या माळा, टोपी विक्रेते या सर्वाचे आयुष्य आता थांबले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लेणी किती दिवस बंद ठेवण्यात येतील आणि पर्यटक आले तरी अभ्यासाची भूक असणारी मंडळी आता गाईड घेतील का, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आता एकमेकांना सांगत आहेत, ‘पूर्वी केलेली बचत सांभाळा. लागेल तेवढेच घ्या. काटकसर करा. पुढचे वर्षभर काही मिळणार नाही, हे लक्षात घेऊन वागा.’

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्य़ात अजिंठा, वेरुळ ही जगप्रसिद्धी लेणी आहेत. या शिवाय‘बीबी का मकबरा’, औरंगाबाद शहरातील लेण्यांनाही परदेशी पर्यटक भेटी देत. त्यांना विविध भाषांमधील गाईड लागत. अब्रार गेली अनेक वर्षे हे काम करत. पण आता सारे थांबले आहे. केवळ अब्रारच नाही तर वृद्ध पर्यटकांना खांद्यावर घेऊन उंच कडा आणि लेणी परिसर फिरणारे डोलीवाले यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.

अमोध बन्सोल याच क्षेत्रात काम करणारे. ते म्हणाले, जोपर्यंत ‘कोविड-१९’ वर लस काढली जात नाही तोपर्यंत सारे सुरळीत होण्याची शक्यताच नाही. आभाळच फाटले आहे, कोठे ढिगळ लावणार? त्यामुळे आता पुढचे वर्ष काही एक मिळणार नाही असे समजून वागा, असे संदेश आम्ही एकमेकांना देत आहोत.

असेही पर्यटकांमध्ये गाईडसह लेणी पाहण्याची गरज वाटणारे कमीच असतात. जाणून घेण्याच्या वृत्तीसाठी रक्कम मोजण्याची विचारी वृत्ती हे पर्यटनातील टोक असते. आता या व्यवसायावर संकट कोसळले आहे. पर्यटक येणार नसल्याने तारांकित हॉटेलांचा व्यवसाय कमी होईल. ‘टूर ऑपरेटर्स’मधील नोकऱ्यांवरही संकट आहे. या क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्य़ात किमान आठ ते दहा हजार जणांच्या हातांना काम होते. करोनामुळे या नोकऱ्या आता धोक्यात येणार आहेत.

जगायचे कसे, हा प्रश्न आहेच. पुढील वर्षभर या क्षेत्रात फारशी प्रगती होणार नाही, असे गृहीत धरून किमान काही जणांना सरकारने मदत करावी, अशी विनंती आहे. 

– अब्रार रझाक, गाईड, अजिंठा