मांजरा धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने कमी झाल्याने गेल्या आठवडय़ापासून लातूर औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. अंबाजोगाई, कळंब आणि लातूर या तीन शहरांसह उद्योगाला होणारा पाणीपुरवठा आणि उपलब्ध पाणी याचा विचार करून लातूर औद्योगिक वसाहतीला दिल्या जाणाऱ्या पाण्यात मोठी कपात होण्याची शक्यता आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासमोर हा प्रश्न चर्चेत आल्यानंतर तूर्तास दिल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी ५० टक्के पाणी बुधवारी द्यावे व पुढे औद्योगिक वसाहतीला पाणी पुढे चालू ठेवायचे की त्यात कपात करायची, याबाबतचा निर्णय गुरुवारी विशेष बैठकीत घेतला जाणार आहे.

लातूर जिल्ह्य़ातील १५०० उद्योगांना लागणारे पाणी बंद करण्यात आले होते. त्यामुळे उद्योजक अडचणीत आले होते. मांजरा धरणात सध्या २४ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. पाच महिन्यांनंतर पाऊस येईल, असे गृहीत धरून नियोजन केले तर नऊ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होईल आणि अस्तित्वात असणाऱ्या पाण्यामध्ये साधारणत: अडीच ते तीन दलघमी गाळ असू शकतो, असा अंदाज असल्यामुळे जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्यात लातूर शहरालाही पुन्हा पाणीटंचाईची झळ बसू शकते, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे एमआयडीसीचे पाणीकपात करण्यात आले होते. फेब्रुवारी अखेपर्यंत पाणीपुरवठा करण्यास पूर्वी मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पाणी बंद करण्याचा निर्णय झाल्याने उद्योजक अडचणीत आले.

या पुढील काळात पाण्याची कपात झाली तर हरकत नाही. किमान पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी औद्योगिक विकास महामंडळातर्फे अधीक्षक अभियंता सुधीर नागे आणि मुख्य अभियंता सुभाष तुपे यांनी लेखी स्वरूपात केली होती. मात्र, सर्वत्र पाणीटंचाई असताना औद्योगिक वसाहतीमध्ये दररोज पाणीपुरवठा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात करण्याची गरज आहे का, याची तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दररोज चार लक्ष लिटर पाणी औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक असल्याचे अधिकारी सांगत होते. मात्र, पाण्याची गरज नक्की तेवढीच आहे का, प्रक्रियेसाठी लागणारे पाणी आणि मनुष्यबळ याची संख्या लक्षात घेऊन पुन्हा एकदा पाण्याची गरज तपासा आणि होईल तेवढी मागणी कमी केली तर पाणी देता येऊ शकते काय, या शक्यतांवर विचार केला जाईल, असे विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. कळंब, अंबाजोगाई या शहरांना लागणारे पाणी याचा विचार करून उपलब्ध पाणी जुलै अखेपर्यंत पुरेल, असे नियोजन करायचे असल्यास औद्योगिक वसाहतीच्या पाण्यात कपात करावी लागेल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

मांजरातील पाण्याच्या नियोजनाबाबत गुरुवारी बैठक घेणार असून त्यात औद्योगिक वसाहतींना पाणी द्यायचे की नाही आणि दिले तर किती याबाबतचा निर्णय होईल. तोपर्यंत दिलासा म्हणून बुधवारी ५० टक्के पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याची माहिती विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.