मालमोटारींचे हप्ते कसे भरणार; वाहतूकदारांचा सवाल

औरंगाबाद : टाळेबंदी आणि निर्बंधामुळे वाहतुकीवर ७० टक्के परिणाम झाला आहे. परराज्यात नेण्यासाठी किंवा तेथून आणण्यासाठी माल नाही. कारण अनेक उत्पादनांना उठाव नाही. ज्या क्षेत्रात उत्पादित माल हवा आहे, त्याला करोनामुळे निर्बंध आहेत. परिणामी एकूण मालमोटारीच्या ८० टक्के गाडय़ावर रस्त्यावर नाहीत. परिणामी उलाढाल घटल्याने मालमोटारीचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न वाहतूक व्यावसायिकांसमोर पडला आहे. वर्षभरात केवळ एखादा महिना पूर्ण क्षमतेने वाहतूक झाली असेल. या वर्षी एका मालमोटारीचा हप्ता ८० ते ९० हजार रुपयांच्या घरात असल्याने आता आर्थिक ताण खूप अधिक आहे, असे ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले.

करोना काळातील वाहतूक व्यवसायातील औरंगाबादमधील घट साधारणत: ४० कोटी रुपयांची असू शकेल. जिल्ह्यात साधारणत: २५ हजार मालमोटारी असून करोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ दोन-अडीच हजार मोटारीच रस्त्यावर असतील. परिणामी घेतलेल्या मालमोटारीचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांसाठी कर्जहप्ते पुढे ढकलण्याची मुभा देताना व्याज माफ करावे, अशी मागणी औरंगाबाद औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. पुढील काही दिवस टोल माफ केले, तरी मोठा दिलासा मिळू शकेल. पण वाहतूकदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एक मालमोटारची किंमत दहा लाखांपासून २५ लाखांपर्यंत असते. त्यामुळे त्याचे प्रतिमाह हप्तेही अधिक असतात. वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे.

वाहनचालकांनाही मोठय़ा अडचणी जाणवत असून करोना काळात परराज्यात अडकून पडलेल्या मालमोटारीचेही मोठे प्रश्न असल्याचे सांगण्यात येते. परराज्यातून रिकामी मालमोटार आणणे म्हणजे स्वत:हून नुकसान करून घेणे आहे. पण आता कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली येथे करोना कहर असल्याने तेथूनही माल मिळणे अवघड होत आहे. त्याचा मालमोटार वाहतुकीच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला  आहे. वाहतूक क्षेत्रातील विविध संघटनांनी आता या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने खास तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. कपडा, चप्पल, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांसह प्राधान्यक्रम यादीत नसलेल्या उत्पादित मालाची वाहतूक बंद आहे.