औरंगाबाद : ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेच्या औरंगाबाद विभागीय  अंतिम फेरीत सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या आदित्य देशमुख याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. नगर जिल्ह्य़ातील लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचा सुजीत मेहेत्रे यास द्वितीय, तर औरंगाबादच्या सीएसएमएस महाविद्यालयाची प्राजक्ता सवासे हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (पुणे) कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. दासू वैद्य यांनी काम पाहिले. ज्योती चंद्रे आणि तेजस्विनी केंद्रे या दोन विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.

विभागीय अंतिम फेरीच्या तयारीसाठी प्राथमिक फेरीत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी केली होती. विषयाची व्याप्ती, मुद्दे, उदाहरणे, सुभाषिते, कविता याची शोधाशोध सुरू होती. स्पर्धेत कोड क्रमांकाचा पुकारा होईपर्यंत स्पर्धक विषयाच्या तयारीत गुंतलेले होते. दुपारी स्पर्धेला सुरुवात झाली आणि ‘काश्मीरची जमीन आपलीच’, ‘महाविकासाची युती’, ‘विराट प्रश्न’ आणि ‘मंदिरातला राम’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपापली मते मांडली. उत्स्फूर्तता, लालित्यपूर्ण भाषा याबरोबरच वेळेच्या मर्यादेचे  भान ठेवत उपस्थितांना आपला मुद्दा पटवून सांगण्यासाठी प्रत्येक स्पर्धक कसोशीने प्रयत्न करत होता.

निकाल जाहीर करण्यापूर्वी परीक्षक प्रा. दासू वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘भाषेची ऋजुता, लालित्य, आरोह- अवरोह याचबरोबर एक साधेपणाही असेल तर तो मनाला भावतो. दुसऱ्यांच्या मतांचा आदर करायला शिकणेही आवश्यक असते. या स्पर्धेमुळे तरुणाईत वैचारिक जडणघडण वाढावी, अशी ‘लोकसत्ता’ची अपेक्षा आहे. ती स्पर्धेच्या निमित्ताने पूर्ण होताना दिसत आहे. बहुतांश स्पर्धकांनी मांडलेले मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत. पण बऱ्याचदा माहितीपटासारखे ते समोर येतात तेव्हा त्याची अडचण वाटू लागते. तसे न करता भाषेतील गंमतही आपल्याला जपता यायला हवी.’

स्पर्धकांशी बोलताना परीक्षक प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,की बोलणे ही प्राथमिक प्रक्रिया आहे. लिहिण्या आणि बोलण्यामध्ये बोलणे प्रथम येते. एखादे व्याख्यान देण्यापूर्वी ते मनाशी बोलावे लागते. वारंवार बोलल्यानंतर त्याचे व्याख्यान होते. उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम श्रोता व्हावे लागते. वाचनही वाढवावे लागते. प्रा. शिवाजीराव भोसले, प्रा. निर्मलकुमार फडकुले यांच्यासह बहुतांश वक्तयांबरोबरच्या सहवासातून हेच गमक समजले आहे. वक्तृत्व हा शब्दांचा खेळ नसून त्याचा विचारांशीही मेळ बसावा लागतो.

स्पर्धेतील विजेत्यांना आणि सहभागी विद्यार्थ्यांना या वेळी ‘लोकसत्ता’चे विभागीय वितरण प्रमुख वंदन चंद्रात्रे, चंद्रशेखर देवकर आदींच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिके वितरित करण्यात आली.

प्रायोजक : वीणा वर्ल्ड प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर, अशा आठ केंद्रांवर होत आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉपरेरेशन लिमिटेड असून स्पर्धेचे बँकिंग पार्टनर डोंबिवली नागरी सहकारी बँक हे आहेत. नॉलेज पार्टनर चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रीसर्च हे आहेत.