सरकारकडून अनुशेष काढण्यासाठी नव्या समितीची शिफारस

औरंगाबाद : अविकसित भागातील अनुशेष काढण्यासाठी नेमलेल्या केळकर समितीचा अहवाल गुंडाळण्यात येणार असून येत्या काळात विभागस्तरावर अनुशेष काढण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी शिफारस राज्यपालांकडे केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मराठवाडय़ाच्या विकासाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळास केली. मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह मराठवाडय़ातील काही आमदार आणि तज्ज्ञ मुख्यमंत्र्यांकडे विकासाचा प्रश्न घेऊन चर्चेसाठी गेले होते. या चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

या शिष्टमंडळात सहभागी असणारे सिंचन क्षेत्राचे अभ्यासक या. रा. जाधव यांनी मराठवाडय़ातील सिंचनासाठी निधी कमी पडत असल्याची तक्रार केली होती. अनुशेषाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पातील केवळ १५ टक्के निधी मराठवाडय़ाला मिळतो. असे किती दिवस चालेल, असा प्रश्न केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अनुशेषासाठी पुन्हा एकदा स्वतंत्र समिती नेमण्याची शिफारस केल्याचे सांगितले.

गेल्या काही वर्षांत मराठवाडय़ाला मिळणारा अर्थसंकल्पातील निधी बाराशे ते चौदाशे कोटी रुपये एवढा असतो. त्याची टक्केवारी साधारण १५ टक्के एवढी होते. तुलनेने विदर्भाला ५५ टक्के निधी मिळतो. त्यामुळे पूर्वी काढलेला अनुशेष चुकीचा होता. केळकर समितीने विभागनिहाय अनुशेष न काढता तालुका घटक धरून अनुशेष काढले. मराठवाडय़ातील हिंगोली वगळता अन्य कोणत्याही जिल्ह्य़ाचा अनुशेष शिल्लक नाही. त्यामुळे विभागनिहाय अनुशेष काढावा, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यात आली. यावेळी अनुशेष काढण्यासाठी नेमलेल्या केळकर समितीचा अहवाल नामंजूर करून विभागस्तरावर नव्याने अनुशेष काढण्याची समिती नेमण्याची शिफारस राज्य सरकारने केली असल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांना सांगण्यात आले.

‘मराठवाडय़ाला निधी कमी’

या शिष्टमंडळात सहभागी असणारे सिंचन क्षेत्राचे अभ्यासक या. रा. जाधव म्हणाले की, मराठवाडय़ाच्या वाटय़ाला निधी कमी येतो. अनुशेष काढण्यासाठी नेमलेल्या केळकर समितीने मराठवाडय़ाचा अनुशेष काढलाच नाही. त्यामुळे निधीच्या पातळीवर मराठवाडय़ावर सतत अन्याय होतो. सिंचनाच्या अनुशेषाचा प्रश्न कायम आहे. मात्र, राज्य सरकार अनुशेष संपल्याचे सांगत आहे. वास्तविकता तशी नाही, हे समजण्यासाठी नव्याने समिती नेमली तरच मराठवाडय़ाला लाभ होऊ शकेल.