मूळ अंदाजपत्रक ६४.४० कोटींचे, काम १० कोटींतच उरकण्याचे आदेश

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने औरंगाबाद शहरात करण्यात येणारे स्मृतिवन स्मारक १० कोटींमध्येच बसवावे, असे आदेश राज्य शासनाकडून धडकले आहेत. स्मारकाचे मूळ अंदाजपत्रक ६४.४० कोटींचे आहे. स्मारकासाठी उर्वरित निधी देण्यात राज्य शासनाने आखडता हात घेऊन शिवसेनेला एकाप्रकारे सूचक इशाराच दिला आहे. आता महापालिका निधी कोठून उभा करणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

औरंगाबाद शहरातील सिडको भागात सात हेक्टरवर बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन उभारण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाप्रमुख होण्यापूर्वी व्यंगचित्रकार म्हणून ओळख होती. शिवसेनाप्रमुखपदासह बाळासाहेबांची व्यंगचित्रकार ही ओळखही स्मृतिवनात जपली जाणार असून त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांसाठी स्वतंत्र दालन उभे करण्यात येणार आहे. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी जाग्या होतील, अशा त्यांच्याशी संबंधित वस्तू, भाषणांच्या ध्वनिमुद्रिका, छायाचित्रे या स्मृतिवनात राहणार आहेत. एक पुतळाही उभारला जाणार आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर २०१६ पासून हे स्मारक उभारण्यासाठी मनपा प्रयत्न करत आहे. या स्मृतिवनासाठी महानगरपालिकेने ६४ कोटी ४० लाखांचे अंदाजपत्रक तयार केलेले आहे. त्यातील पाच कोटींचा निधीही मनपाला मंजूर करण्यात आला. मात्र आता अचानक राज्य शासनाकडून एक पत्रक काढून स्मारक १० कोटींमध्येच बसवण्याचा आदेश काढून एक सूचक इशाराच शिवसेनेला दिल्याचे मानले जाते.

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ

राज्य शासनाकडून काढलेले पत्र हे १ ऑगस्ट २०१६ च्या मंत्रिमंडळ बठकीच्या अनुषंगाने आहे. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची काहीतरी गफलत झालेली असू शकते. मनपाकडून स्मृतिवनाचा प्रस्ताव पुढे जात नाही तोपर्यंत यात काही होऊ शकत नाही. तरीही आम्ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. मुख्यमंत्र्यांनीही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द आम्हाला दिलेला आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.