औरंगाबाद : महाराष्ट्रासाठी जवळपास दोन हजार पाचशे कोटींच्या एकूण १०९ अन्न प्रक्रिया उद्योग प्रकल्पांना केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यातून दहा हजार कोटींची गुंतवणूक व रोजगार निर्मिती होईल, असे मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी व्यक्त केले. तसेच या क्षेत्रात देशात महाराष्ट्रच अव्वल स्थानी राहील, असा विश्वासही व्यक्त केला.

औरंगाबाद-पठण रस्त्यावरील धनगाव येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेंतर्गत निर्मित पठण मेगा फूड पार्कच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती कौर बोलत होत्या. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संदीपान भुमरे, महापौर नंदकुमार घोडेले, केंद्रीय उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. राकेश सरवाल, नाथ उद्योग समूहाचे चेअरमन नंदकिशोर कागलीवाल, कार्यकारी संचालक सतीश कागलीवाल, संचालक आकाश कागलीवाल आदी उपस्थित होते.

श्रीमती कौर म्हणाल्या, महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योग वाढतो आहे. महाराष्ट्रात केंद्र शासनाने सातारा, औरंगाबाद आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर ५३ शीतगृहे, १८ अन्न तपासणी प्रयोगशाळा, आठ मिनी फूड पार्क, ११ बॅकवर्ड  फॉरवर्ड लिंकेज आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे, असेही कौर म्हणाल्या. प्रधानमंत्री किसान संपदा, मिनी फूड पार्क, बँकेशिवाय निधी, या योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली. देसाई म्हणाले, संत एकनाथ, पठणीमुळे पठणचा नावलौकिक आहे. परंतु या पार्कमुळे पठणची नवीन ओळख निर्माण होईल. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.

यावेळी भाजीपाला उत्पादनाची तंत्रशुद्ध माहिती असलेल्या शेतकरी मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ  संशोधकांचाही श्रीमती कौर, देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

फूड पार्कची वैशिष्टय़े

* भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेअंतर्गत प्रकल्प.

* नाथ ग्रुप फूड पार्कचे मुख्य प्रवर्तक.

* जवळपास ५०० शेतकरी प्रत्यक्षपणे जोडले जाणार.

* ५०० एकरावर मका पिकाची तंत्रशुद्ध लागवड.