• ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. तिवारी यांचे मत
  • अंबाजोगाईत थाटात संमेलनाचे उद्घाटन

संतांपेक्षा मोठा साहित्यिक अद्याप जन्मलेला नाही. बोले तैसा चाले त्याप्रमाणे जो बोलतो, लिहितो आणि तसाच वागतो तो खरा साहित्यिक, असे सांगून माणसामध्ये दहशतवादालाही जिंकण्याची आत्मशक्ती साहित्यातून निर्माण होते, असे मत ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांनी येथे केले. विभागातील आठही जिल्ह्यांतील बोली भाषेचे शब्दकोश तयार करावेत, असे आवाहनही त्यांनी या वेळी मराठवाडा साहित्य परिषदेला केले.

अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या परिसरातील आद्यकवि मुकुंदराज साहित्यनगरीत आयोजित ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाप्रसंगी ते बोलत होत. बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठवाडा साहित्य परिषदेद्वारा आयोजित या संमेलनाचे उद्घाटन बीडच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी संमेलनाच्या व्यासपीठावर खासदार रजनी पाटील, माजी मंत्री सुरेश धस, रमेश आडसकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, साहित्य परिषदेचे दादा गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना प्रा. रंगनाथ तिवारी यांनी समाजातील बदलते स्थित्यंतरे, शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन बदल, साहित्याचा समाजावर पडणारा प्रभाव, लेखणीची ताकद, सरकारची भूमिका, राजकारणातील घसरता स्तर आदींवर आपले परखड भाष्य केले. प्रा. तिवारी म्हणाले, एक शिक्षक, एक लेखणी जग बदलू शकते अशी ताकद साहित्यात आहे. मात्र साहित्यिकाला, माणसाला ‘मी’ कळला पाहिजे. मी कोण आहे? याचा शोध आयुष्यभर घ्यावा लागतो. त्यासाठी चिंतनाची बैठक आवश्यक आहे. शिक्षक समाजाला आत्मभान देतो. पण सध्या सरकारने शिक्षकांकडे मुलांना शिकवण्यापेक्षा इतर कामे लावल्याची खंत प्रा. तिवारी यांनी व्यक्त केली. नोकरी मिळवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागत असतील, तर या समाजात सत्ता आणि संपत्ती ही व्यभिचाराच्या पलीकडे गेली आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्यातून खरा इतिहास समाजासमोर यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून वेगवेगळ्या चित्रपटांतून इतिहासाची छेडछाड करून मांडले जाणारे चित्र चुकीचे असल्याचे सांगितले. माजी मंत्री सुरेश धस यांनी राजकीय विचारधारेवरही साहित्याचा प्रभाव असतो, असे सांगून यशवंतराव चव्हाणांपासून विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे या नेत्यांनी बळ दिल्यामुळेच साहित्य चळवळ समृद्ध झाली. प्रारंभी सकाळी शिवाजी चौक ते योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या परिसरातील संमेलनस्थळापर्यंत जागर दिंडी निघाली. या दिंडीचा शुभारंभ मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते व रमेशराव आडसकर, मुंबईच्या सुवर्णा खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. दिवसभरात तीन परिसंवाद झाले. कविसंमेलन झाले. मराठवाडा साहित्य संमेलनात या वेळी प्रथमच शिक्षकांचेही संमेलन होणार असल्याने आणि रविवार, नाताळच्या सुटीच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातून शिक्षकांनीही लक्षणीय संख्येने हजेरी लावल्याचे दिसले. संमेलनात विविध पुस्तकांचे स्टॉल असून साहित्य रसिकांनी येथे गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अनेक परिसंवादात नवोदित कवी, साहित्यिकांनी आपली परखड मते नोंदवली.

साहित्य निर्मितीला अभिव्यक्तीची गरज

माणसाला इतिहास कळल्याशिवाय भविष्य समजणार नाही. यासाठी साहित्यिकांनी गौरवाचा, शौर्याचा इतिहास मांडावा. साहित्यातून, माध्यमातून मांडल्या जाणाऱ्या आक्रमकतेतही पावित्र्य जपावे. माध्यमांनी घटना, विषय मांडताना समाजाची शांतता हिरावून घेऊ नये, असे सांगून साहित्य निर्मितीला भाषेची नव्हे तर अभिव्यक्तीची गरज असते, असे मत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. या वेळी मुंडे म्हणाल्या, संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी आणि प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे गुरुशिष्याचे नाते असल्याने त्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहे. आठवणींना शब्दबद्ध करून निर्माण होणारे साहित्यच जीवनात खरा आनंद निर्माण करू शकते. माणसाला इतिहास कळल्याशिवाय भविष्य समजणार नाही. साहित्यातून सातत्याने गौरव व शौर्याचा इतिहास मांडला, तर नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळेल.

साहित्याच्या प्रेमातून संमेलनाची प्रेरणा

आपल्याला इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे कशी अडचण झाली होती, याचा किस्सा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी अत्यंत मिश्किलपणे सांगितला. या वेळी ते म्हणाले, भविष्यात जिल्ह्यातील नव्या पिढीला हे ज्ञान मिळावे यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्य आणि शिक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे आणि शिक्षकांना सन्मान मिळावा, यासाठी हे साहित्य संमेलन घेतले. त्यासाठी साहित्यिक असलेले तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्याशी चर्चा केली. माकेगाव येथील शाळेत शिक्षण घेताना अंबाजोगाईतील गायक दत्ता मुकादम यांच्याशी संपर्क आला. मुकादम हे साहित्याचे व्यासंगी. त्यातून आपणही साहित्याकडे वळलो. ना.धों.महानोर, नारायण सुर्वे, रामदास फुटाणे, फं.मु.िशदे अशा साहित्यिकांना जवळून ऐकल्यामुळे साहित्याची आवड निर्माण झाली. साहित्याच्या प्रेमापोटीच संमेलनाची प्रेरणा मिळाली, असे सभापती राजेसाहेब देशमुख म्हणाले.