|| बिपीन देशपांडे

करोनानंतरच्या विकारामुळे भय, चिंतेने ग्रासले

औरंगाबाद : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून आणि कार्यालयातूनही कर्तव्य बजावणारी पोलीस, प्रशासकीय यंत्रणा सध्या मानसिक थकव्यातून जात आहे. त्यातही करोना झालेल्यांना लहानसे दुखणेही चिंता वाढवणारे वाटत असून कर्तव्य बजावण्यात थोडीशीही कसूर झाली तर निलंबन दट्ट्याच्या भयछायेत वावरावे लागत असल्याचा ताण मानसिक थकवा वाढवत आहे. असे तणावाखाली वावरणारे अधिकारी, कर्मचारी मानसतज्ज्ञांकडे समुपदेशानासाठी धाव घेत आहेत.

राज्याच्या विविध भागांतील प्रशासकीय यंत्रणेकडूनही कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी समाजमाध्यमावर मानसतज्ज्ञांना समाविष्ट करून काही गट, हेल्पलाइन सुरू केलेली असून त्याद्वारे समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती येथील डॉ. संदीप शिसोदे यांनी दिली.

पोलीस, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका असे सर्वच सध्या करोनाशी लढा देण्याच्या प्रक्रियेत काम करत आहेत. त्यांच्या कामाचे नेमके तास ठरलेले नाहीत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक जण कुटुंबापासून दूर राहतात. वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलांची चिंता त्यांना सतावते आहे. पोलिसांना रस्त्यावर नियमभंग करून चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांबाबतही प्रत्येकवेळेला राग व्यक्त न करता कडक भूमिका घेता येत नाही. ही घुसमट बाहेर पडत नाही. युद्धभूमीत राहिल्यासारखा त्यांचा अनुभव आहे. अनेक पोलीस, कर्मचारी, अधिकाऱ्यांना करोना होऊन गेलेला आहे.

करोनोत्तर आजारही वाढू लागले आहेत. पुन्हा करोना होतो की काय, अशी भीती त्यांना वाटत असून भविष्याची कुटुंबाबाबत चिंताही सतावत असल्याच्या तक्रारी मानसतज्ज्ञांसमोर मांडण्यात येत आहे, असे डॉ. शिसोदे यांनी सांगितले.

पोलिसांचे समुपदेशन

करोनानंतर होणाऱ्या त्रासांसाठी, मानसिक थकवा, ताणतणावासाठी मानसतज्ज्ञ, योगा, आहार तज्ज्ञांचा एक गट समाजमाध्यमावर केलेला आहे. त्याद्वारे तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. करोनामुक्त झालेल्या पोलिसांचे लहान-लहान चित्रफितीही केलेल्या आहेत. त्याद्वारे मनोबल वाढवण्याचे काम पोलीस विभागाकडून केले जाते. – डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

प्रतिकारशक्ती ही मानसिकरीत्या ठरवली जाते. ताणतणावाने प्रतिकारशक्ती कमी होते. जे मानसिकदृष्ट्या स्वत:ला नाकारतात ते लवकर आजाराच्या आहारी जातात. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, करोनायोद्ध्यांनी घरी जाताना दिवसभरात काय-काय घडलं माझ्यासोबत ते एकमेकांशी बोलणे अत्यंत गरजेचे आहे. – डॉ. संदीप शिसोदे, मानसतज्ज्ञ.

आतापर्यंत ४५० पोलिस कर्मचारी, ५२ अधिकाऱ्यांना करोना झालेला आहे. सध्या रुग्णालयात कोणीही नाही. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत ते गृहविलगीकरणात आहेत. करोनानंतर होणाऱ्या त्रासासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी तज्ज्ञांचा एक गट केलेला आहे. प्रत्यक्ष अधिकारीही पोलीस कर्मचाऱ्यांचे बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन मनोबल वाढवतात. – मीना मकवाना, पोलीस उपायुक्त.