आक्रमक ओवेसींच्या भाषणांत आता भावनिकतेला महत्त्व

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

उमेदवारी दिल्यानंतर ‘एमआयएम’मध्ये निर्माण झालेली नाराजी आणि केवळ भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करून मुस्लीम मतदार पक्षाच्या बाजूने वळतील की नाही, याविषयी शंका असल्याने आक्रमक भाषणशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी त्यांचे भाषण अधिक भावनिक करण्यावर भर दिला असल्याचे दिसून येत आहे.

गुरुवारी सायंकाळी शिवसेनेवर त्यांनी टीका तर केली. मात्र त्या टीकेपेक्षाही मृत्यूनंतर आपला दफनविधी औरंगाबाद येथे व्हावा आणि येथील माणसांच्या खांद्यांवरून आपली शेवटची यात्रा व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याच पद्धतीचे उद्गार त्यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातही काढले होते.

ओवेसीच्या औरंगाबाद येथील सभांना तरुणांची मोठी गर्दी असते. कोणी तरी नारा-ए-तकबीर अशी घोषणा देतो आणि त्याला अल्ला हो अकबर असा प्रतिसाद मिळतो. ओवेसी भाषणाला सुरुवात करतात आणि हैदराबादी लहजा बाळगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करताना ते ‘मोडी’ असा उच्चार करतात. त्यातला उपहास श्रोत्यांना पदोपदी जाणवत असतो. गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांची टीका काँग्रेस-राष्ट्रवादीवर अधिक असायची. त्या पक्षाची मते एमआयएमच्या पदरात पडायला सुरुवात झाली आणि टीकेचा सूर फक्त भाजप-शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिकतेवर प्रहार करण्यापर्यंत मर्यादित राहू लागला.

गुरुवारच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. ‘हिरवा साप’ अशी उपमा देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओवेसी यांच्या ‘या भूमीत दफनविधी व्हावा’, या भावनिक उद्गाराचा समाचार घेतला होता. तुम्ही इकडे कशाला, तुम्ही तिकडेच जा, असे उद्धव ठाकरे जाहीर सभेत म्हणाले होते. या त्यांच्या भूमिकेचा ओवेसींनी पुन्हा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘या भूमीत कमालीचे समाधान आहे. तरुणांमध्ये मला आशा दिसते आहे. त्यामुळे मृत्यू आलाच तर त्यानंतर मला या भूमीतील ‘दो गज जमीन’ मिळावी. पण या माझ्या भावनेची कदर करावी, एवढे दातृत्वसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यात नाही. या भूमीतील रोवलेला झेंडा सिमेंट-काँक्रीटमध्ये नाही तर लोकांच्या मनामध्ये आहे. आता तो सहजासहजी उखडून काढता येणार नाही.’ मृत्यूनंतरची इच्छा असा प्रचाराचा भावनिक मुद्दा करून ओवेसी यांनी गुरुवारच्या सभेत फक्त शिवसेनेवर टीका केली.

आक्रमक भाषणासाठी ओळखले जाणारे ओवेसी अचानक भावुक का होत आहेत, या प्रश्नाचे उत्तर ‘एमआयएम’मधील नाराजी हे आहे, असे सांगितले जाते. याच सभेत त्यांनी नाराजांनाही चुचकारले. ते म्हणाले, ‘ज्यांना मी उमेदवारी दिली आहे, त्यांच्यापेक्षाही जे नाराज आहेत, ते मला अधिक ‘अजीज’ आहेत. जे कोणी नाराज असतील, त्यांचा पक्ष योग्य तो सन्मान करेल.’ या भावनिक मुद्दय़ाबरोबरच राष्ट्रवादीच्या उमेदवारावरही ओवेसी यांनी टीका केली. कदीर मौलाना हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांचा उल्लेख ‘बंदर राजनैतिक मौलाना’ असा करत राष्ट्रवादीचा आणि इकबाल मिर्चीचा संबंध काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पण भाषणाचा बहुतांश भाग भावनिक असल्यामुळे मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणासाठी आक्रमक ओवेसी औरंगाबादमध्ये भावनिक भाषण करत असल्याचे दिसले. पहिल्या प्रचारसभेत नाराज उमेदवारांनी काहीसा गोंधळ निर्माण केला होता. या पाश्र्वभूमीवर त्यांचे पहिले भाषण ‘गांधी विरुद्ध गोडसे’ या मुद्यावर केंद्रित झाले होते.

सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध

गुरुवारी सायंकाळी सभा घेतल्यानंतर शुक्रवारी दिवसभर औरंगाबाद मतदारसंघातील विविध भागांत ओवेसी यांनी पदयात्रा काढली. गल्लोगल्ली ते फिरले. सावरकरांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या आश्वासनांवरही त्यांनी टीका केली. गांधीहत्येच्या कटाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या कपूर समितीने दिलेल्या अहवालात सावरकर यांचा उल्लेख असल्याचे सांगत त्यांना भारतरत्न देण्याऐवजी भगतसिंग यांना तो द्यावा, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.