मंत्रिपदाच्या राजीनाम्याची हूल देत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार हॉटेलमध्ये रुसून बसल्याने औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांनी महाआघाडीच्या विरोधात भाजपला मतदान केले. परिणामी भाजप आणि महाआघाडीच्या उमेदवारांना समसमान मते पडली आणि शेवटी चिठ्ठीरूपी शक्याशक्यतेच्या खेळात महाआघाडीला अध्यक्षपद मिळाले. मात्र उपाध्यक्षपद भाजपला मिळाले.

जिल्हा परिषदेत सत्ता मिळविताना सिल्लोड मतदारसंघाची राजकीय गणिते आपल्या मनाप्रमाणे व्हावीत, यासाठी शुक्रवारी रात्री ‘मी राजीनामा तोंडावर फेकला आहे’ असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना सांगून शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार एका हॉटेलमध्ये रुसून बसले. त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारित झाले आणि त्यांची समजूत काढण्यासाठी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेतला. एका बाजूला अशी राजी-नाराजी सुरू असताना जिल्हा परिषदेच्या मतदानात महाआघाडीविरुद्ध जात सत्तार यांच्या समर्थकांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. शिवसेनेतील बंडखोरांना पाठबळ देत सत्तार यांनी जुळवून आणलेली गणिते फलद्रूप झाली नाहीत. शेवटी महाआघाडी आणि भाजपपुरस्कृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांना प्रत्येकी ३० मते मिळाली. शेवटी नशिबाच्या जोरावर काँग्रेसच्या मीना शेळके यांच्या नावाची चिठ्ठी निघाली.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत महाआघाडी होण्यापूर्वीच काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित सत्ता स्थापन केली होती. भाजपबरोबर राज्यात युती असतानाही औरंगाबादमध्ये केलेला हा प्रयोग पुढे चालू राहू नये, अशा प्रकारचे राजकारण राज्यमंत्री सत्तार यांनी आखण्यास सुरुवात केली. काँग्रेस पक्ष सोडून आल्यामुळे त्या पक्षाविषयी असणारा राग, विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या प्रभाकर पालोदकर यांना समर्थन देणारे श्रीराम महाजन यांना विरोध करण्यासाठी म्हणून सत्तार यांनी व्यूहरचना करायला सुरुवात केली, ती शिवसेना नेत्यांना आवडली नाही.

चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि आमदार अंबादास दानवे यांनी महाआघाडीचे सरकार आल्यामुळे काँग्रेसला अडीच वर्षे अध्यक्षपदासाठी दिलेला शब्द खरा केला जावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला सत्तार यांनी तडा दिला. असे करताना राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी पसरवली. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले. एका बाजूला जि.प.चे मतदान कोणाच्या बाजूने झुकावे यासाठी प्रयत्न सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळातील नाराजीचे कारण पुढे केल्यामुळे सत्तार यांची नाराजी घालविण्यासाठी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर सक्रिय झाले. ‘ते माझे मित्र आहेत, माझे ऐकतील’ असे सांगत त्यांनी दुपारी एकच्या सुमारास सत्तार यांच्याशी तासभर चर्चा केली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘सत्तार यांनी राजीनामा दिलेला नाही. तसे कोणतेही जाहीर वक्तव्य त्यांनी केलेले नाही.

बीडमध्ये भाजपविरोधी पक्षात

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला बरोबर घेत महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवरही यशस्वी केला. भाजपचे तीन सदस्य फोडत सत्तांतर घडवून पंकजा मुंडे यांना राजकीय धक्का दिला. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर जिल्हा परिषदेची सत्ताही हातून गेल्याने भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. युतीकडे बहुमत असतानाही शिवसेनेने साथ सोडल्याने पंकजा यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. धनंजय यांनी सत्ता मिळवून तीन वर्षांपूर्वीच्या पराभवाचे उट्टे काढत भाजपला धोबीपछाड दिला.

सत्तार गद्दार – खैरे

सत्तार यांनी खरोखर राजीनामा दिला की नाही, तो दिला असेल तर कोणत्या व्यक्तीकडे हे शनिवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट नव्हते. या अनुषंगाने बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘माझ्यासमोर सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा तोंडावर फेकला आहे असे सांगितले आणि शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या देवयानी डोणगावकर यांना मदत करण्यासाठी त्यांचे सहा समर्थक पाठविले. त्यांची ही कृती शिवसेनेशी गद्दारी करणारी आहे. त्यांना मातोश्रीवर बोलावले आहे. पण तेथे त्यांना पायरीही चढू देऊ नका, असे मी पक्षप्रमुखांना सांगणार आहे.’