मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा धडकणार आहे. राज्यभरातून या मोर्चाची जोरदार तयारी सुरु आहे. याची पूर्वतयारी म्हणून वेगवेगळ्या शहरात दुचाकी रॅली काढत मोर्चासाठी वातावरण निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ चा नारा देत मोर्चा काढण्यात येत आहे. या ‘मराठा क्रांती मुक मोर्चा’ यशस्वी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील काही मुस्लिम बांधव पुढे आले आहेत. मराठा मोर्चाला जाणाऱ्या वाहनांच्या दुरुस्तीचे काम ते करणार आहेत. त्यासाठी त्यांनी कोणताही मोबदला न घेता मोर्चात सहभागी वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी पथक तयार केले आहे.

माजलगाव येथील रियाझ काझी आणि त्याचे मित्र मिळून हा उपक्रम राबवणार आहेत. यावेळी एकाने मराठा मोर्चासाठी तुम्ही काय करणार असे विचारले. त्यावेळी आम्ही वाहने दूरस्त करतो, तेच काम मार्चात करू असे त्यांनी सांगितले आणि चर्चेतून या पथकाचा जन्म झाला. माजलगावमधील वाहन दुरस्त करणाऱ्या सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी पथक तयार केले. सुरुवातीला माजलगाव तालुक्यापुरत मर्यादित काम करण्याचे ठरले होते. मात्र, या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यानी बीड जिल्ह्यात हा उपक्रम राबवायचा निर्णय घेतला असे पथकातील सदस्य असलेल्या कादरभाई यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी बीड, गेवराई, माजलगाव आणि औरंगाबाद अशी चार पथकेही तयार केली आहेत. यामध्ये सर्व समाजातील नागरिकांनी सहभाग घेतला आहे. सर्वांनी आपल्या भागातील वाहनांची जबाबदारी घेतली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी उपक्रमाची माहिती मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहचवली आहे. शिवाय एक हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चारचाकीच्या मदतीने मोर्चा मार्गात मदत करण्यासाठी नियोजनही त्यानी केले आहे.

माजलगाव, बीड, गेवराई आणि औरंगाबाद मिळून तीस जणांची त्यांची टीम तयार झाली आहे. टीममधल्या प्रत्येक सदस्याचे काम आणि त्याचा संपर्क क्रमांक नागरिकांसाठी खुला केला आहे. बीड, माजलगाव आणि गेवराई तालुक्यात कोठेही सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मैत्री आणि त्यांच्यासोबतच्या चर्चेतून हा कार्यक्रम आम्ही हाती घेतला. त्यानंतर महाराष्ट्रभरातून खूप सारे अभिनंदनाचे फोन येत आहेत. त्यामुळे काम करण्याचा ऊसाह वाढल्याचे त्यांनी सांगितले. ९ ऑगस्टची आम्ही वाट पाहत असून आमची पूर्ण तयारी झाली असल्याचेही ते म्हणाले.