News Flash

एक कोटी ७७ लाख रुपयांच्या गुंतवणुकीमागे एक रोजगार

एक कोटी ७७ लाख रुपयांच्या गुंतवणुकीमागे एक रोजगार

डीएमआयसीमधील उद्योग आणि रोजगाराचे प्रमाण व्यस्तच

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद:  गुंतवणूक आणि रोजगार याचे व्यस्त प्रमाण वाढत चालले असून औरंगाबाद येथील दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील ऑरिक सिटी प्रकल्पात एक कोटी ७७ लाख ८७ हजार रुपये गुंतवणुकीमागे एका व्यक्तीस काम असे चित्र दिसून येत आहे.  राज्य बंॅकर्स समितीकडून मुख्यमंत्र्यापर्यंत सादर केलेल्या अहवालानुसार गेल्या काही वर्षांत डीएमआयसीमध्ये पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आणि रोजगार उपलब्ध झाले केवळ २८११ एवढेच. डीएमआयसीमधील दहा हजार एकरात महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील  २१२ एकरातील ६२  भूखंडाची विक्री झाली आहे. निर्यातक्षम उत्पादन करणाऱ्या अत्याधुनिक कंपन्यांची गुंतवणूक झाली असली तरी त्याचा मागास भागात रोजगार निर्माण करण्यास अपयश येत असल्याचे आतापर्यंतच्या औद्योगिक विकास प्रक्रियेत दिसून येत आहे. दरम्यान यात धोरणात्मक बदल व्हायला हवेत अशी मागणी आता उद्योजक करत आहेत.

औरंगाबाद येथील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील या उद्योग नगरीत उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्योगासाठी सर्व प्रकारची परवानगी देण्यासाठी एकाच ठिकाणी सुविधा, पाणी, वीज, दूरसंचार व्यवस्थेसह सर्व नियंत्रण आणि देखभाल ही एकाच नियंत्रण कक्षातून करता येईल अशी सोय करण्यात आली आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते, ड्राय पोर्ट आणि नव्याने होणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे उद्योगाची वाढ करण्यास उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गंतवणुकीमध्ये अनेक कंपन्यांनी रस दाखविल्याने आतापर्यंत पाच हजार कोटीहून अधिक रकमेची गुंवणूक झाली खरी. पण बहुतांश कंपन्या या निर्यातक्षम उत्पादन करणाऱ्या आहेत.  गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती या विषयी बोलताना सीआयआयचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले, ‘डीएमआयसीमध्ये होणारी गुंतवणूक योग्य प्रकारे सुरू आहे. मोठय़ा औद्योगिक प्रकल्पात होणारी गुंतवणूक आणि रोजगाराचा राष्ट्रीय दर हा एक कोटी २० लाखास एक असा आहे. त्यापेक्षा ऑरिकमधील दर काहीसा अधिक वाटत असला तरी तो अगदीच सुरुवातीच्या टप्प्यातला म्हणावा लागेल. पण रोजगाराच्या अनुषंगाने औद्योगिक विकास साध्य करायचा असेल तर धोरणात्मक बदल आवश्यक आहेत. २०-२५ सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्यांचा एक मोठा उद्योग  आणि असे किमान ३० कंपन्यांनी या भागात यावे यासाठी प्रयत्न करावे लागतील. ’ दरम्यान डीएमआयसीमधील पायाभूत सुविधा आणि संधी याची पाहणी करण्यासाठी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ  कांत सोमवारी औरंगाबादचा दौरा करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 12:04 am

Web Title: one person get job after 77 crore 87 thousand rupees investment in auric city project zws 70
Next Stories
1 औरंगाबादेतील उद्योजकांच्या कोविडकाळातील मदत कार्यपद्धतीची निती आयोगाकडून दखल
2 श्वसन यंत्रे तपासणीसाठी केंद्राचे दोन प्रतिनिधी औरंगाबादमध्ये
3 महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातेत म्युकरमायकोसिसचे अधिक रुग्ण
Just Now!
X