प्रशासन अनभिज्ञ; नागरिकांत घबराट
दुष्काळामुळे हवालदिल उस्मानाबादकरांना आता नवीन संकटाने घेरले आहे. मागील २ वर्षांपासून सुरू असलेली गूढ आवाजाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. दोन दिवसांपूर्वी आवाजाने हादरलेले उस्मानाबादकर भानावर येतात न येतात तोच शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा जोरदार आवाज आणि जमिनीची कंपने जाणवली. उस्मानाबादसह उमरगा, तुळजापूर, लोहारा परिसरात हा हादरा जाणवल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले.
उस्मानाबाद जिल्ह्यास दुष्काळाबरोबरच १९९३ मध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाचीही पाश्र्वभूमी आहे. दुष्काळात खचलेल्या जनतेला आíथक समस्यांनी घेरले असताना गूढ आवाजाची मालिका नवीन अंधश्रद्धांना जन्म देणारी ठरली आहे. भूकंपाच्या आठवणी आणि वेदना ताज्या असल्यामुळे छपरावरून एखादे कुत्रे अथवा मांजर पळाले, तरी नागरिक दचकून उठतात. मागील दोन वर्षांपासून सतत गूढ आवाजाच्या हादऱ्यांमुळे अनेकांनी धसका घेतला आहे. या आवाजामागचे नेमके कारण देण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे नवीन अंधश्रद्धा आणि गरसमजांना पेव फुटले आहे.
भला मोठा आवाज होऊन किमान १५ ते २० मिनिटे त्याची कंपने जाणवतात. हा गूढ आवाज भूकंप की जमिनीतील पोकळीमुळे ही समस्या निर्माण होत आहे. यामागे भौगोलिक कारणे काय, याचा शोध घेण्याची साधी तसदीही प्रशासनाने घेतली नाही. शुक्रवारी सकाळी पुन्हा या गूढ आवाजाने चार तालुक्यांना हादरा दिला. सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन अनेकांच्या घरातील भांडी जमिनीवर कोसळली. अनेकांच्या घरात भिंतीवरील प्रतिमा खाली पडल्या. आवाजाची तीव्रता एवढी की, अनेक भागांतील लोक दचकून घराबाहेर धावले. आवाजापाठोपाठ जाणवणाऱ्या हादऱ्यांमुळे हा भूकंपच असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.
लातूरच्या भूकंप मापनयंत्रावर मात्र याची कसलीही नोंद झाली नाही. सातत्याने हा प्रकार सुरू असल्यामुळे या बाबत प्रशासनाने योग्य कारणांसह जनतेला माहिती दिल्यास निर्माण झालेली भीती आणि असुरक्षितता कमी होऊ शकेल.

भूगर्भीय पोकळीमुळेच गूढ आवाज – डॉ. नारनवरे
गूढ आवाजामागे भूगर्भात निर्माण झालेली पोकळी हेच कारण असावे. यापूर्वी या बाबत तज्ज्ञांकडे आम्ही विचारणा केली होती. त्या वेळी असे आवाज भूगर्भातील पोकळीमुळे येत असल्याचा अहवाल त्यांनी दिला होता, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. उस्मानाबादसह लातूर, बीड जिल्ह्यांतही काही ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. निश्चितच यामागे वैज्ञानिक कारणे असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच तसेच अंधश्रद्धांनाही बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी केले आहे.