राजेश टोपे यांचा दावा

औरंगाबाद : करोना विषाणूची लागण झालेल्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी म्हणून हाती घ्यावयाच्या रक्तद्रव उपचार पद्धतीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रमुखांबरोबर चर्चा झाली असून केवळ करार झाला नाही म्हणूनही उपचार पद्धती सुरू होत नाही, हे चित्र बदलेल, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला. औरंगाबाद येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) या उपचार पद्धतीची सुरुवात का होऊ शकत नाही, याचा आढावा शनिवारी घेण्यात आला.

‘घाटी’ रुग्णालयात रक्तद्रव उपचार पद्धती सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. रक्तदात्यांकडून रक्तद्रवही घेण्यात आला. रक्तामधील एका पेशीमागे ६४० प्रतीपिंड (टी  पेशी) तयार आहेत की नाही हे तपासल्यानंतर राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून त्यास परवानगी मिळण्याची आवश्यकता असते. ती अद्यापि मिळालेली नाही. म्हणून या संस्थेचे प्रमुख अब्राहिम यांच्याशी चर्चा झाली असून सामंजस्य करार झाला नाही म्हणून उपचार पद्धती सुरू झाली नाही, असे होणार नाही. या अनुषंगाने कोणतीही अडचण असल्यास त्याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी, अशा सूचना केल्याचेही टोपे म्हणाले. दरम्यान जिल्ह्यात रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत असून राज्यात नव्याने ५००  रुग्णवाहिका घेण्याच्या निविदा प्रकाशित झाल्या आहेत. तसेच वैधानिक विकास मंडळाकडून तसेच मानव विकास मशीन अंतर्गत ६० रुग्णवाहिका घेण्यासाठी काढण्यात आलेल्या प्रशासकीय त्रुटी दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान औरंगाबाद शहरात सर्वाधिक एक लाख अ‍ॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या असून ही संख्या प्रतिदशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यात सर्वाधिक असल्याचेही टोपे यांनी सांगितले. या बैठीस खासदार इम्तियाज जलील, खासदार डॉ. भागवत कराड, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची उपस्थिती होती.