बनावट कागदपत्राआधारे एकाच भूखंडाची परस्पर दुसऱ्याला विक्री केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध औरंगाबाद सिटी चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. फरीद खान शब्बीर खान (रा. रोशनगेट रोड) व शेख आमेर शेख अल्ताफ (रा. फाजलपुरा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर नरेंद्र दिनकर कुलकर्णी (सारा वैभव सोसायटी, जटवाडा रोड) व मोहम्मद मुमताजोद्दीन, अशी या प्रकरणातील अन्य दोघांची नावे आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संदर्भात खुलताबाद तालुक्यातील अजामशाहीपुरा येथील मुजीब खान सरदार खान पठाण यांनी तक्रार दिली आहे. पठाण यांना पडेगाव व जयसिंगपुरा भागात भूखंड घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी फरीद खान याच्याशी संपर्क साधला होता. फरीद खानने त्यांना जयसिंगपुरा भागातील पाच भूखंड दाखवून त्याचा पाच लाखांत व्यवहार केला. या वेळी त्याने हे भूखंड मित्र शेख आमेरचे असल्याचे सांगितले होते. मुजीब खान यांनी भूखंड पसंत असल्याचे सांगून फरीद व आमेरला टोकण म्हणून एक लाख रुपये दिले. तर उर्वरित चार लाख रुपये नोंदणी व खरेदीखत झाल्यानंतर देईल, असे सांगितले होते. मात्र, मुजीब खान यांना दोघांवर संशय आला. आपली फसवणूक होण्याचा अंदाज येताच पठाण यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्याशी संपर्क साधला.

सावंत यांनी सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्याकडे तपास सोपवला. त्यांच्या सोबतचे सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सापळा रचला. तक्रारदार व आरोपींमध्ये ठरल्यानुसार व्यवहार होणार होता. याच दरम्यान आरोपींनी ४ लाख रुपयांची मागणी करताच पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडे विचारणा केली असता, यामध्ये नरेंद्र कुलकर्णी व मोहम्मद मुमताजोद्दीन यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. कुलकर्णी याने पहिले बनावट व खोटे कागदपत्रे तयार करून दिले होते तर मुमताजोद्दीन याने कोणीही साक्षीदार नसताना खोटी नावे टाकून खरेदीखत बनवण्यास मदत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. संबंधित प्रकरणातील पाचही प्लॉटचे मूळ मालक गयासोद्दीन मोहम्मद इसाक (रा. टाकळी, ता. खुलताबाद) हे असून त्यांच्या जागी अन्य साक्षीदार उभे केले होते. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.