हैदराबाद, उन्नावमधील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर  सतर्कतेचे पाऊल

औरंगाबाद : हैदराबाद, उन्नाव येथील तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचे एकूणच देशपातळीवर उमटणारे परिणाम पाहता पोलीस विभाग अधिक सतर्कतेने पावले टाकत असल्याचे दिसत आहे. देशपातळीवरील या अत्याचाराच्या आणि दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातीलच एका शालेय सहलीदरम्यान शिक्षकानेच विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस विभाग नव्या २०२० या वर्षांत लोकांशी थेट  संवादाचा सेतू तयार करण्यासाठी ‘मोबाइल ठाणे’ नावाची एक संपर्क यंत्रणा राबवणार आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या संदर्भातील माहिती दिली. त्या अनुषंगाने पाच हजार लोकसंख्येपर्यंतची किंवा एखाद्या गावात गंभीर गुन्ह्य़ांच्या मोठय़ा दोन-तीन घटना वर्षभरातच घडलेल्या, अथवा आठवडी बाजाराच्या गावात जाऊन तक्रार निवारणांसाठी पोलीस विभागाकडून कार्यवाही करण्यात येणार आहे.

प्रत्येक गावात जाऊन तेथील ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी संवाद साधला जाईल. त्यांच्याकडून गुन्ह्य़ाशी संबंधित माहिती, आढावा घेतला जाईल. पोलीस विभागाचे एक पथक नागरिकांमध्ये एखाद्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तक्रार दाखल करण्याच्या अनुषंगाने माहिती देणार आहेत. मोबाइलमध्येच प्राथमिक तक्रारीची माहिती नोंद करून ती पुढे गुन्ह्य़ाचे स्वरुप पाहून ठाण्यांमध्ये नोंद करण्यात येईल. यासाठी एक पोलीस अधिकारी राहणार आहे. तक्रारीशिवाय कायद्याच्या ज्ञानाबाबतही समुपदेशन करण्यात येणार आहे.

औरंगाबाद हा वेरुळ-अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, दौलताबादच्या किल्ल्यासारख्या ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेला जिल्हा आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनाही एखाद्या गुन्ह्यसारख्या घटनेचा सामना करता येऊ नये, यासाठीही ही मोबाइल ठाणे किंवा ‘पोलीस आपल्या दारी’, या संकल्पनेचा उपयोग होईल, असा विश्वासही पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी व्यक्त केला.

सोयगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांना भेटी देण्यासाठी काढण्यात आलेली आहे. या सहलीदरम्यानच एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली. वर्षभरापूर्वीच सोयगाव तालुक्यातील जरांडी येथेही एका मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग ‘मोबाइल ठाणे’ किंवा ‘पोलीस आपल्या दारी’ सारखी संपर्क यंत्रणा हाती घेत आहे.

गावात जाऊन  मुलींसाठी मुलांसोबतही संवाद

गावनिहाय जाऊन पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षकसारख्या पदावरील अधिकारी शाळेतील मुलांशीही संवाद साधणार आहेत. मुलगी व मुलगा, अशा लिंगभेदाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या गुन्ह्यत होणाऱ्या शिक्षेसंदर्भात  मुलांना माहिती देण्यात येणार आहे. शिवाय बसमधून शाळेसाठी इतरत्र जाणाऱ्या मुलींनाही  कोणी त्रास देत आहे का, याची विचारणाही पोलीस अधिकारी करणार असल्याचेही मोक्षदा पाटील यांनी सांगितले.