आकडे फुगवल्याचा वन्यजीवप्रेमींचा आरोप

बुद्धपौर्णिमेला राज्यात ठिकठिकाणच्या अभयारण्यात झालेल्या प्राणी गणनेत बिबटे, नीलगाय, कोल्हे अशा अनेक प्राण्यांची सख्या कैकपटीने वाढल्याची आकडेवारी सांगणारा अहवाल वनविभागाने सादर केलेला असला, तरी ही संख्या फुगवून सांगण्यात आल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींमधून होत आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील गौताळा अभयारण्यात अचानक नीलगाईंची संख्या ४०० वर पोहोचली असून दुपटीने वाढलेल्या बिबटय़ांच्या संख्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

गौताळा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला वनविभागाकडून प्राणी गणना करण्यात आली. दोन-तीन दिवसानंतर वनविभागाकडून वन्यप्राण्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. वन्यजीवप्रेमींच्या मते ही प्राण्यांची संख्या दर्शवणारी आकडेवारी अचंबित करणारी आहे. यामध्ये १४ बिबटे व त्यांची ४ पिले सापडली. २३०० रानडुकरांचा वावर या अभयारण्यात आहे. याशिवाय २५४ काळवीट, ८३७ मोर, ३२ लांडगे, ५३ कोल्हे, तब्बल ४०० नीलगाई, यासह सायाळ, ससे, अजगर, तडस, भेकर असे अनेक वन्यजीव आढळल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत बिबटय़ांची संख्या दुपटीने वाढली आहे. गतवर्षी केवळ ७ बिबटय़ांचा वावर गौताळात होता. तर नीलगायी या केवळ ७० होत्या. त्यांची संख्या ३३० ने वाढली आहे. या संख्येवर वन्यजीव प्रेमींमधून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नीलगाई एवढय़ा मोठय़ा संख्येत वाढू शकत नाहीत. शिवाय काळवीटांची संख्या २५४ पेक्षा अधिक असायला हवी, ती तुलनेने फारच कमी आहे. २५४ काळवीट हे एखाद्या लहान जंगलातही मिळू शकतील. त्यांची संख्या अधिक असणार. वनविभागाकडून मात्र गतवर्षी अधिक पाऊस झाल्याने तृण, झाडे वाढली. परिणामी वनसंपत्तीत वाढ झाल्याचे वनविभागाकडून सांगितले जाते.

ही शिरगणती नव्हे

गौताळ्यातील प्राणी गणना ही काही थेट शिरगणती नसते. ७१-७२ पाणवठय़ांवर जाऊन ही गणना केलेली आहे. त्यात समोर आलेली संख्या आम्ही नोंद केलेली आहे. त्यात चार-दोनचा फरक असू शकतो. पण पूर्ण चुकीची म्हणता येणार नाही. वन्यजीव प्रेमी गौताळ्यातील काही भागच फिरतात. त्यावरून ते तर्क लावतात. परंतु गौताळा हे चाळीसगावच्या नजीक असलेल्या पाटणादेवीपर्यंत २१ हजार हेक्टरवर विस्तारलेले आहे. गतवर्षी वनविभागाकडून वैरण विकास अंतर्गत कामे झालेली आहेत. त्यामुळे नीलगाई वाढल्या, अनेक जीव वाढले आणि शिकार मिळते म्हणून बिबटेही वाढले. पी. व्ही. जगत, सहायक वनसंरक्षक, औरंगाबाद

संख्या वाढली आनंददायी

गौताळा अभयारण्यातील प्राण्यांची संख्या वाढली हे आनंददायी आहे. पण अभयारण्यात वणवा पेटण्याच्या घटना अलीकडे अनेकवेळा घडल्या आहेत. त्याचा प्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. त्याकडेही वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.  डॉ. किशोर पाठक, पक्षिमित्र