25 November 2020

News Flash

‘बाहेरून कार्यकर्ते घ्या आणि पक्षातली खदखद वाढवा’

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी अन्य पक्षातील व्यक्तींना मोठी पदे देण्याचा सपाटाच चालू ठेवला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कार्यशैलीमुळे कार्यकर्ते नाराज

‘जसा आहे तसा स्वीकारा आणि पाहिजे तसा घडवा’ हा जणू मूळमंत्र असावा असे समजून भाजपमध्ये नवनवीन व्यक्तींना प्रवेश देण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. वैजापूर नगरपालिका निवडणुकीदरम्यान डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश मिळविला. तेवढय़ासाठी खास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आग्रही होते. नवीन माणूस घ्यायचा आणि येणाऱ्याला महत्त्वाचे पद देऊन टाकायचे, अशी कार्यशैली दानवे यांनी अनुसरल्यामुळे भाजपतील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये कमालीची खदखद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अलीकडेच करण्यात आलेल्या नेमणुका याच पद्धतीच्या असल्याने कार्यकर्ते तिखट शब्दांत व्यक्त होत आहेत- ‘आमचेच दात, आमचेच ओठ’. विशेषत: स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना पद्धतशीरपणे डावलण्याचा घाट घातला जात आहे. यातूनच भाजपचे प्रवक्ते आणि पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी त्यांचा व्यवस्थापन परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तोही नियुक्ती आदेश मिळाल्यावर लगेच दुसऱ्या मिनिटाला. जशी विद्यापीठात खदखद आहे, तशीच ती ग्रामीण भागातही जाणवत असून, वैजापूरमध्ये परदेशी यांच्या नियुक्तीमुळे भाजपचे ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव यांची कोंडी झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी अन्य पक्षातील व्यक्तींना मोठी पदे देण्याचा सपाटाच चालू ठेवला. औरंगाबाद शहरात प्रमोद राठोड, विजय औताडे यांना भाजपमध्ये प्रवेश तर दिलाच शिवाय उपमहापौरपदही दिले. यामुळे वर्षांनुवर्षे भाजपचे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले. पण त्याची कोणी दखलच घेत नाही, अशी खंत कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. बोलायचे तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपमधील नियुक्त्यांनाही आता जातीचे रंग दिल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे. आयारामांना ‘धनदौलती’च्या जोरावर नियुक्त्या मिळत आहेत आणि निष्ठावानांना पद्धतशीरपणे बाजूला केले जात आहे, असे आवर्जून सांगणारे कार्यकर्ते समाजमाध्यमातून व्यक्त होऊ लागले आहेत. व्यवस्थापन परिषदेवर किशोर शितोळे यांच्या नेमणुकीनंतर हा गोंधळ अधिक तीव्रपणे समोर आला आहे. शिक्षणक्षेत्रातील या नियुक्त्यांचा विचार करताना संघपरिवारातील काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांला पद दिले असते तर काही वाटले नसते. मात्र आता नियुक्त्या मनमानी पद्धतीने केल्या जात आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्युपश्चात त्यांच्याविषयीचा आकस अजूनही बाळगला जात आहे, असा आरोपही करण्यात येतो. या अनुषंगाने बोलताना प्रा. गजानन सानप म्हणाले, ‘आमचेच दात आणि आमचेच ओठ’. कोणाला बोलणार? काही गोष्टी वास्तवातल्या आहेत. त्या स्वीकाराव्या लागतील. पण आम्ही निष्ठेने काम करणारे आहोत.’’

पैठण येथील बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खुशाल मुंडे म्हणाले, भारतीय जनता पक्षात होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याविषयीचा आकस कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यांना त्यांच्या हयातीत मानणाऱ्या कार्यकर्त्यांला पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यांच्या समर्थकांना प्रदेशाध्यक्ष डावलतात, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे.

विद्यापीठातील नियुक्त्यानंतर कार्यकर्त्यांमधील अशी खदखद बाहेर येत असताना नवीन पक्षातील राजकीयदृष्टय़ा वजनदार व्यक्तींना प्रवेश देण्याचा सपाटाच सुरू आहे. केवळ काँग्रेसच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही प्रवेश देण्यात आला. वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत दिनेश परदेशी यांच्या सर्व समर्थकांना उमेदवारी देण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांना खास बोलावून घेऊन त्यांनाही उमेदवारी देण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फोडून त्यांच्या हातात कमळ दिल्याने यश मिळेल, असा दावा भाजपचे कार्यकर्ते करत असले तरी निष्ठावान कार्यकर्त्यांचे पुनर्वसन कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2018 3:05 am

Web Title: raosaheb danve work style issue bjp worker
Next Stories
1 कचऱ्याचा प्रश्न दहा दिवसांत निकाली
2 कन्हेरगावात कॉपीमुक्तीचे धिंडवडे!
3 औरंगाबाद येथे भरधाव कंटेनर दुकानात घुसला, २० जणांना चिरडले
Just Now!
X