संभाजी पाटील निलंगेकर यांचा दावा

मी वडिलोपार्जित मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढले. कोणाची फसवणूक केली असेल तर न्यायालय देईल तो निर्णय मला मान्य आहे. कौटुंबिक कलहापोटी माझ्यावर राजकीय आरोप होत आहे, असा दावा करतानाच आपल्याला जनतेने दिला, तसाच न्याय न्यायव्यवस्था देईल याचा पूर्ण विश्वास असल्याचे कामगार कल्याण व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सर्वपक्षीय सत्काराला उत्तर देताना सांगितले. काही चुकीचे काम केले असेल व पदाचा दुरुपयोग केला असेल, तर माझा राजीनामा मी केव्हाही देईन, असे भाजप अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. मी राजकीय कारकीर्दीत कोणाचेही आíथक नुकसान केले नाही. माझ्या परीने विकासासाठीच सहकार्य केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

निलंगा मतदारसंघातील औराद शहाजनी येथे सकाळी मिरवणूक काढून निलंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. निलंगेकर म्हणाले की, मी बँकेचा जामीनदार आहे. शेतकऱ्यांकडून पसे घेऊन उद्योग काढला नाही. माझी वडिलोपार्जित मालमत्ता गहाण आहे. आगामी काळात तालुक्यास प्रगतीकडे नेण्याचाच प्रयत्न असेल. विविध क्षेत्रांतील कामगारांना न्याय देण्याचा, आíथक स्थर्य आणण्याचा प्रयत्न असेल. पंतप्रधानांचे कौशल्य भारतचे स्वप्न आहे. ते खाते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे होते. त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. आपल्या भागातील तरुण पुणे, मुंबई, हैदराबाद येथे रोजगारास जातात. आता त्यांना आपल्या राज्यातच व्यवसायाची संधी आपल्या खात्यामार्फत उपलब्ध करून दिली जाईल. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी कौटुंबिक कलहातून कोणतेही राजकीय आरोप आम्ही केले नसल्याचे स्पष्ट केले.

‘औराद तालुका करू’

औराद शहाजनी येथे सत्काराला उत्तर देताना आपल्या राजकीय कारकीर्दीत औरादवासीयांचे स्थान महत्त्वाचे असून या गावाचा विकास करण्यासाठी आगामी काळात औराद शहाजनी तालुका करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले.