औरंगाबाद : पाकिस्तानातील सत्ताधारी आणि लष्करी  अधिकारी स्वपक्षाकडे सत्ता राहावी म्हणून भारताविरुद्ध बोलत असतात, हे माझे वक्तव्य पाकिस्तानची स्तुती करणारे आहे काय, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्यापूर्वी अधिक माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांना शुक्रवारी दिले.

५२ वर्षे संसदीय राजकारणात असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी माहिती न घेता बोलणे बरे नव्हे. मी संरक्षणमंत्री होतो, पाकिस्तान आणि चीन काय आहेत, हे मला माहिती आहे. मलाही बोलता येईल. पण पंतप्रधानपदाची मला अप्रतिष्ठा करायची नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शुक्रवारी पवार बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीही बोलू शकतात. त्यांचे बोलणे नाना फडणवीस यांच्यासारखे, असे म्हणत पवार यांनी, पर्यटनाच्या नावाखाली गड-किल्ल्यांमध्ये हॉटेल आणि बार काढण्याची परवानगी दिल्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याची परंपरा असणाऱ्या किल्ल्यांमध्ये आता तरुणांनी छमछम पाहायची का, असा सवालही त्यांनी केला.

केंद्र सरकारला गुंतवणुकीचे वातावरण निर्माण करता आले नाही म्हणून गेल्या दीड वर्षांपासून उद्योग क्षेत्राला उतरती कळा लागली आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, केंद्रातील भाजपचे सरकार बळीराजाची नव्हे तर भांडवलदारांची चिंता असणारे आहे, अशी टीका पवार यांनी जालना येथे केली.

अमित शहांवर टीकास्त्र

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना पवार यांनी त्यांच्या चालण्याची साभिनय नक्कल केली, तर धनंजय मुंडे म्हणाले, पवार संपतील, असे शहा किंवा कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. शहा यांनी महाराष्ट्रात येऊन पवारांवर टीका केली, तशी टीका मी गुजरातमध्ये जाऊन शहा यांच्यावर केली तर तेथील जनता ते सहन करील का? शहा म्हणतात, की पवारांनी साठ-सत्तर वर्षांत काय केले? पवारांनी जेवढे विमानतळ महाराष्ट्रात बांधले, तेवढी बस स्थानकेही अमित शहा यांनी गुजरातमध्ये बांधलीत का?