भाजपसमोर आव्हान उभे करण्याची तयारी

राष्ट्रवादी व भाजपमधील नाराजांना गळाला लावून राजकीय ताकद वाढवण्यासाठी शिवसेना पक्ष नेतृत्वाने लक्ष केंद्रित केले असून अनेक वषार्ंनंतर पहिल्यांदा इतर पक्षातील मोठय़ा नेत्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेवराईतील माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील दिल्यानंतर इतरही काही मतदारसंघातील प्रमुख नाराज नेत्यांना पक्षात घेण्याच्या हालचालींना वेग आल्याने भविष्यात भाजपसमोर शिवसेनेचेच आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढतील.

बीड जिल्हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा असल्याने शिवसेना पक्ष नेतृत्वाने जिल्ह्यात फारसा हस्तक्षेप केला नाही. भाजप सेनेची युती झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेनेकडील तीन मतदारसंघ भाजपकडे घेतले. केवळ बीड हा एकमेव मतदारसंघ सेनेकडे राहिला. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती तुटल्यानंतर सेनेला उमेदवार शोधण्याची वेळ आली. भविष्यातही स्वतंत्र लढावे लागणार असल्याने सेना नेतृत्वाने सहाही मतदारसंघात तगडे उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. दिवंगत मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे यांना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मागच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जाहीर समर्थन दिले होते. मात्र, स्थानिक पातळीवर पालकमंत्री मुंडे यांच्याकडून सेनेच्या कार्यकर्त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची जाहीर तक्रार कार्यकत्रे करतात. या पाश्र्वभूमीवर दुष्काळाच्या निमित्ताने पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यात थेट शेतकऱ्यांना मदत वाटप करून गाव पातळीपर्यंत शिवसेना बांधण्याचा प्रयत्न केला. दुष्काळात शिवजल क्रांतीच्या माध्यमातून मदत केली. तर आता इतर पक्षातील नाराजांना थेट पक्षात घेऊन राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पहिल्याच प्रयत्नात गेवराईतील राष्ट्रवादीचे माजी मंत्री बदामराव पंडित यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे. तर बीड मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या दिग्गज कुटुंबातील फाटाफुटीनंतर बंडखोर आघाडीला पक्षात घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचबरोबर आष्टी मतदारसंघात माजी आमदार पुत्र आणि भाजपचे मागचे वेळी विधानसभा लढवलेले प्रमुख कार्यकत्रेही स्थानिक पातळीवरील अंतर्गत वाद आणि भविष्यात भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर माजलगाव मतदारसंघातील माजी आमदार पुत्रानेही नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात आघाडी निर्माण केली. त्यामुळे तेही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे इतर मतदारसंघातही राष्ट्रवादी भाजपमधील नाराज कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात लढण्याची तयारी शिवसेना करत आहे.