मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

कोणत्याही कंपनीने सामाजिक दायित्व निधीतून ४५ रुपये दिले तर राज्य सरकार ५५ टक्के निधी देण्यास तयार असेल, असे नवे धोरण विकासकामांसाठी आणत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. खासगी भागीदारीला लोकसहभागाबरोबर जोडून जलसंधारणामध्ये नव्या पद्धतीने काम करणार असल्याचे त्यांनी गंगापूर येथे सांगितले. गंगापूर तालुक्यातील रांजणगाव येथील लघुसिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याच्या मोहिमेची सुरुवात रविवारी सुरू करण्यात आली.  बजाज ऑटो या कंपनीमार्फत येथील कामांना २६२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा आहे.

बजाज ऑटो व लोकवर्गणीतून गंगापूर तालुक्यातील ११० गावांतील एक लाख ५० हजार एकर तलावातील गाळ काढण्यात येणार असून याचा लाभ २५ हजार ८५७ कुटुंबांना होईल, असा दावा सरकारी यंत्रणेने केला आहे.

तशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली. ११ पोकलेन मशिन, दोन जेसीबी, ५१ टिप्परच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खरे, आमदार प्रशांत बंब, अतुल सावे, बजाज ऑटोचे उपाध्यक्ष मधुर बजाज यांची या वेळी उपस्थिती होती.

अलीकडच्या काळात औरंगाबाद जिल्ह्यत गंगापूर तालुक्यात मुख्यमंत्र्यांनी केलेला हा तिसरा दौरा होता. ४ ऑगस्ट २०१७ मध्ये या मतदारसंघातील गवळीशिवार येथे आयोजित गंगागिरी महाराजांच्या सप्ताहासाठी मुख्यमंत्री आले होते. प्रशांत बंब यांनी घेतलेल्या महाआरोग्य शिबिरासही त्यांनी हजेरी लावली होती. ते पुन्हा त्यांनी गंगापूर तालुक्यातील जाहीर कार्यक्रमास हजेरी लावली. औरंगाबाद विभागात पुन्हा एकदा गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजनाही जोरदारपणे राबविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. अनुलोम ही संस्था या कामात सरकारला सहकार्य करणार आहे. मराठवाडय़ातील  एक हजार १९१ तलावांतील गाळ मार्च महिन्यापासून काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.