साडेचार टीएमसी पाणी येण्याची शक्यता

नगर-नाशिकमधून जायकवाडीकडे सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह आता काहीसा मंदावला आहे. बुधवारी सकाळी केवळ १०९ द.ल.घ.मी. म्हणजे ३.८६ अब्ज घनफूट पाणी जायकवाडीत पोहोचले होते. निळवंडेतून सध्या पाणी सुरू असले तरी त्याचा वेग फारसा नाही. साधारणत: ५०० ते ७०० क्युसेक वेगाने जलाशयात पाणी येत आहे. त्यामुळे जायकवाडीत साडेचार टीएमसीपर्यंतच पाणी येईल, असे आता सांगितले जात आहे. पूर्वी हा अंदाज साडेपाच टीएमसीचा होता.

नांदूर मधमेश्वरपासून ओझरवेअपर्यंत बांधलेल्या १३ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी अडून राहते. साधारणत: एक अब्ज घनफूट पाणी येथे अडून राहील. त्यामुळे जायकवाडीत येणारे पाणी कमी होईल, असे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगत आहेत. एका बाजूला जायकवाडीत पाणी सोडलेले असताना प्रवराचा उजवा आणि डावा कालवाही सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा वेग मंदावला आहे. आणखी दोन दिवस जलाशयात पाणी येत राहील. त्यानंतर प्रत्यक्षात पाणी किती सोडले आणि किती आले, याचे गणित घातले जाऊ शकेल. जायकवाडीत पाणी यावे म्हणून मराठवाडय़ातील नेत्यांनी संघर्ष केला असला तरी तूट भरून निघेल का, हे सांगणे मात्र अवघड झाले आहे. जायकवाडीत ६.२ टीएमसी पाण्याची तूट होती. एका बाजूला वरच्या धरणातून पाणी येत असले तरी मराठवाडय़ात ३१६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.