बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी बँकांकडून २५ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढून काम सुरू केलेले असल्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीनंतर तसेच राज्य सरकार आर्थिक अडचणीमध्ये असतानाही महामार्गाच्या तरतुदीवर त्याचा काही परिणाम झालेला नाही, असे रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राध्येश्याम मोपलवार यांनी सांगितले. टाळेबंदीमध्ये या मार्गावर काम करणाऱ्या १८ हजार मजुरांपैकी चार हजार मजूर त्यांच्या मूळ गावी परतले होते. ते आता पुन्हा कामावर परत येत आहेत. टाळेबंदीमध्ये स्टील आणि सिमेंटच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने काम काहीसे थांबले होते. मात्र, त्याचा वेग आता पुन्हा रुळावर आला. आतापर्यंत ३२२ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. डिसेंबर २०२० पर्यंत रस्त्यावरून वाहतूक सुरू होईल, असा दावा केला जात आहे.

महामार्गावर कृषी आणि टाऊनशिप उघडण्यासाठीच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून पूर्ण झालेल्या रस्त्याचा दर्जा मुंबई-पुणे महामार्गासारखा असल्याचा दावा करीत मोपलवार म्हणाले की, या मार्गावर असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील बोगद्यााचे कामही पूर्वीच्या वेगाने सुरू आहे. प्रतिदिन साधारणत: सहा ते १२ मीटर काम होत असते. सध्याही त्याचा वेग तेवढाच असल्याचे पाहणीमध्ये आढळून आले आहे.

रस्त्यालगत नऊ टाऊनशिप होणार असून त्याची किमान क्षमता एक लाखापर्यंतची असणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकल्पाचा आढावा घेतला आहे. पुढील वर्षभरापर्यंत आर्थिक पातळीवर कोणतीही अडचण येणार नाही. रस्ते विकास महामंडळाचे इतर प्रकल्पही बँकांकडून कर्ज घेऊन होत आहेत. त्यामुळे तरतूद आणि निधी ही अडचण नसल्याचेही ते म्हणाले.

गेल्या महिनाभरापूर्वी स्टील आणि सिमेंटच्या पुरवठय़ाबाबत अडचणी येत होत्या. आता त्यात कोणतीही अडचण नाही. समृद्धी महामार्गावर ‘ऑप्टिक फायबर’साठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या मार्गाचा धावपट्टी म्हणून उपयोग करण्याचेही नियोजन आहे. त्याचबरोबर २५० ते ३०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्पही कार्यान्वित करण्याची योजना असल्याचे मोपलवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. आंतरराज्य वाहतूक सुरळीत झाल्याने रस्त्याच्या कामाची गती पूर्ववत होत असल्याचा दावा मोपलवार यांनी केला.